वाडिया हॉस्पिटलमध्ये नवजात बाळाची अदलाबदल, डॉक्टर आणि नर्सेसविरोधात गुन्हा दाखल

| Updated on: Nov 17, 2023 | 9:25 AM

पीडित महिलेला एक मोठी मुलगी आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दांपत्य दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करत होतं, पण ती नैसर्गिक रित्या गरोदर राहू शकली नाही. त्यानंतर त्यांनी परळ येथील एका क्लिनिकमध्ये जाऊन आयव्हीएफचा पर्याय निवडला.

वाडिया हॉस्पिटलमध्ये नवजात बाळाची अदलाबदल, डॉक्टर आणि नर्सेसविरोधात गुन्हा दाखल
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई | 17 नोव्हेंबर 2023 : वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये आपले नवजात बाळ बदलण्यात आल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. या प्रकरणी तब्बल पाच महिन्यांनंतर पोलिसांनी अज्ञात डॉक्टर्स आणि नर्सेसविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी, कुटुंबाची खासगी लॅबमध्ये डीएनए चाचणी करण्यात आली, तेव्हा बाळाचा आणि आईचा निकाल निगेटिव्ह आला, असे भोईवाडा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले. रुग्णालयातर्फे मात्र कुटुंबीयांचा हा दावा फेटाळून लावण्यात आला.

सुनीता गंगाधर गंजेजी (41) असे तक्रारदार महिलेचे नाव असून त्या या दादर येथील कामगार नगर येथील रहिवासी आहेत. सुनिता यांचा नवरा एका गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये काम करतो. या दांपत्याला एका 16 वर्षांची मुलगी आहे. गेल्या काही वर्षांपासून ते दुसऱ्या अपत्यासाठी प्रयत्न करत होते, पण सुनिता नैसर्गिकरित्या गरोदर राहू शकली नाही. त्यामुळे अखेर त्यांनी परळमधील एका फर्टिलिटी क्लिनिकमध्ये आयव्हीएफ (IVF) ट्रीटमेंट घेण्याचा निर्णय घेतला.

बाळ दाखवलंच नाही 

IVF ट्रीटमेंटनंतर सप्टेंबर 2022 मध्ये सुनिता ही गरोदर राहिली. त्यानंतर फेब्रुवारी 2023 पासून तिने परळच्या नवरोसजी वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास सुरूवात केली. जूनच्या पहिल्या आठवड्यात तिला प्रसूतीची तारीख देण्यात आली होती. 7 जून रोजी रात्री 9 च्या सुमारास तिने बाळाला जन्म दिला. मात्र बाळाला जन्म दिल्यानंतर आपल्याला ते कधीच दाखवण्यात आलं नाही, असा दावा सुनिता हिने केला. सुरुवातीला तिला सांगण्यात आले होते की ती काही काळ बेशुद्ध होती. आईच्या पोटातील पाणी तोंडात, नाकात आणि कानात गेल्याने बाळाचा जीव गुदमरत असल्ने, त्या वजात बाळाला नंतर अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आले. मात्र ते बाळ आयसीयूमध्ये नेण्याआधी सुनिता यांचे पती गंगाधर यांना मात्र ते बाळ दाखवण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला.

 डीएनए टेस्टनंतर संशय खात्रीत बदलला

मात्र काही महिन्यांतच हे बाळ तिचं नसल्याचा सुनिता हिचा संशय बळावला. अखेर आगस्ट महिन्यात तिने हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. आपण मुलाला जन्म दिला होता, पण आपल्याला मुलगी सोपवण्यात आली, असा संशय तिने अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला. 7 जून रोजी डिलीव्हरी झाल्यानंतर बाळ आपल्याला दाखवण्यात आलंच नाही. अधिकाऱ्यांनी बाळ बदललं असा आरोप सुनिता हिने केला. याप्रकरणी संशय बळावल्यानंतर सुनिता हिने तिची आणि तिच्या नवजात मुलीची खासगी लॅबमध्ये डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याचे रिपोर्ट्स निगेटीव्ह आल्यानंतर तिचा ( बाळ बदलण्यात आल्याचा ) संशय खात्रीत बदलला.

अखेर याप्रकरणी बुधवारी सुनिता यांनी भोईवाडा पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊ फिर्याद नोंदवली. सुनिता हिच्या डिलीव्हरी दरम्यान लेबर वॉर्डमध्ये उपस्थित असलेल्या डॉक्टर आणि नर्सेसविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 336 (इतरांचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणारे कृत्य) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉस्पिटलमध्ये त्या ( डिलीव्हरीच्या) दिवशी ड्युटीवर होते, असे सर्व डॉक्टर्स, वॉर्ड बॉईज आणि नर्सेस यांचे जबाब आम्ही नोंदवत आहोत. तसेच कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेला पालक आणि मुलगी या दोघांच्या नमुन्यांची डीएनए चाचणी घेण्यासंदर्भात पत्रही पाठवण्यात आले आरे, त्यामुळे या केसमधील अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असे पोलिसांनी नमूद केले.

रुग्णालयाने फेटाळले आरोप

दरम्यान, या सर्व प्रकरणात रुग्णालयातर्फेही त्यांची बाजू मांडण्यात आली आहे. एखादे बाळ जन्मावा आल्यानंतर त्या नवजात शिशूसाठी (अंगावर) एक टॅग लावण्यात येतो. आणि ते बाळ व आई यांना डिस्चार्ज मिळेपर्यंत तो टॅग कायम राहतो, असे सांगत कोणताही हलगर्जीपणा झाला नसल्याचे रुग्णालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.