एखाद्या गोष्टीची माहिती शोधायची असेल किंवा एखादा नवा कॉन्टॅक्ट नंबर शोधायचा असेल तर आपल्यापैकी बरेच जण ‘गुगल’ची मदत घेतात, सर्च करतात. पण याच गुगलवर डॉक्टरचा नंबर शोधणं मुंबईतील एका व्यक्तीला भलतंच महागात पडलं असून त्याला सायबर चोरट्यांनी लाखोंचा चुना लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुतण्याला बरं नसल्याने पीडित इसमान गुगलवरून डॉक्टरचा नंबर शोधला. मात्र त्याची हीच चूक नडली. या नंबरमुळे सायबर चोरांनी त्यांच्या मोबाइलचा ताबा घेत परस्पर सुमारे पाच लाख रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडित इसमाने पवई पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून पोलिस आरोपींचा कसून तपास करत आहेत.
नेमकं काय झालं ?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राघव (नाव बदलले आहे) नावाची व्यक्ती पवई येथे राहत असून त्याच्या पुतण्याला डॉक्टरकडे न्यायचे होते. हे डॉक्टर कूपर रुग्णालयात बसत असल्याने राघव यांनी गुगल सर्च इंजिनवर जाऊन या रुग्णालयाचा क्रमांक मिळवला. त्यानंतर त्यांनी इंटरनेटवरून मिळलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने कूपर रुग्णालयाचा प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगितले. डॉक्टरांना भेटण्यासाठी आधी ऑनलाईन नोंदणी करावी लागेल,अस सांगत त्या इसमाने राघव यांना एक लिंक पाठवली. त्यांनी ती लिंक डाऊनलोड केली.
चेक बाऊन्स झाला आणि उघड झाला गुन्हा…
त्यानंतर काही दिवसांनी राघव यांनी काही कामानिमित्त आपल्या खात्यातील २ लाख रुपये रकमेचा चेक एका व्यावसायिकाला दिला. मात्र खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो चेक बाऊन्स झाला आणि राघव गडबडलेच. त्यांनी संबंधित बँकेत जाऊन चौकशी केली असता जी माहिती समोर आली ते ऐकून ते हादरले. राघव यांच्या खात्यामधून 8 ते 10 व्यवहार करून सुमारे 5 लाख रुपयांची रक्कम इतर खात्यांमध्ये वळवण्यात आली, असे त्यांना बँकेतून सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे आणि लाखो रुपये गमवावे लागल्याचे लक्षात येताच राघव यांनी पवई पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.