मुंबई | 12 ऑक्टोबर 2023 : छोट्याशा कारणावरून भांडणं, राग मनात धरून ठेवणं हे आपल्या प्रकृतीसाठी आणि मनासाठीही योग्य नाही. रागाचा वेळीच निचरा झाला नाही तर तो साठत राहतो, आणि एखाद्या क्षणी त्याचा ज्वालामुखीसारखा स्फोट होतो. त्यामध्ये आपल्यासह इतरही उद्ध्वस्त होतात, क्षणात चित्र बदलंत आणि सगळंच बेचिराख होतं. त्यामुळे वेळच्या वेळी बोलून गुंता सोडवलेला बरा. बोलून भांडण मिटवा आणि मोकळं व्हायचं किंवा मग बोलल्यावरही समोरच्याचं पटल नाही तर सरळ तिथून चालू पडायचं.
उगाच धुमसत बसायचं नाही. जुने वाद वेळच्या वेळी मिटवले नाही तर ती खदखद मनात साठून राहते आणि एखाद्या दिवशीच मोठा स्फोट होतो. जुन्या भांडणातून एकाला जीव गमवायला लागल्याची अशीच एक दुर्दैवी घटना मुंबईत (mumbai crime) घडली. दोन मित्र त्यांच्या बॉससोबत पार्टी करत होते. मात्र बोलता-बोलता जुने विषय उकरले गेले आणि त्यातूनच जुना वाद पुन्हा जिवंत झाला. आणि तो वाढलाही. त्याच वादामुळे रागातून एकाने दुसऱ्याचा थेट जीवच घेतल्याचा प्रकार घडला. आरोपी सध्या फरार असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
त्या रात्री काय घडलं ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ही घटना घडली. अरमान (25) आणि इलियास खान (40) हे दोघे मित्र एका केटरिंग कंपनीत काम करायचे. त्यांनी त्यांचा बॉस अनिल मधुकर (50) यांच्याकडून काही पैसे घेतले आणि त्याच पैशांतून ते तिघेही पार्टी करत होते. खाण-पिणं सगळंच सुरू होतं. त्यांनी थोडं मद्यपानही केलं होतं.
पार्टी रंगात आली होती. मात्र बोलता-बोलता अचानक अरमान आणि इलियास या दोघांमध्ये जुन्या कुठल्या तरी वादाचा संदर्भ निघाला आणि तो वाद पुन्हा सुरू झाला. बघता बघता त्यांचं भांडण पुन्हा पेटलं आणि दोघेही हमरी-तुमरीवर आले. दुसऱ्या क्षणी काय झालं माहीत नाही पण संतापलेल्या अरमानने तेथील चाकू उचलून इलियास याच्या गळ्यावर थेट वार केला. तो अचानक खाली कोसळला. बराच रक्तत्रावही झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रागाच्या भरात आपण काय करून बसलो हे अरमानच्या लक्षात तर आले पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. इलियासचा जीव गेला होता. हे पाहून अरमान तेथून तातडीने फरार झाला.
या प्रकारामुळे धास्तावलेल्या अनिल कुमार यांनी कशीबशी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू घेण्यात येत आहे.