मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : मुंबईत दिवसेंदिवस गुन्हेगारांचा (mumbai crime) हैदोस वाढत आहे. शहरातील वाढत्या गुन्ह्यांमुळे नागरिक धास्तावले असून अक्षरश: जीव मुठीत धरून जगत आहेत. त्यातच मुंबईतील सायन परिसरातून एक धक्कादाक व्हिडीओ समोर आला असून टोळक्यातील काही तरूण ड्युटीवरील पोलिसालाल मारहाण करत असल्याचे त्यात दिसत आहे. त्यामुळे आता कायद्याचे रक्षकही सुरक्षित नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
बुधवारी (18 ऑक्टोबर) X वर (पूर्वीचे ट्विटर ) एक व्हिडीओ समोर आला होता. एक पोलीस अधिकारी कथिपणे काही विद्यार्थ्यांशी भांडण करत असल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. मात्र आता त्याच पार्अशवभूमीवर एक नवा व्हिडीओ बाहेर आला आहे, त्यात उपद्रवी तरुणांचा एक गट ड्युटीवर असलेल्या एका पोलिसाला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. तसेच त्याला उद्देशून गैरशब्द वापरत टोमणेही मारत असल्याचे व्हिडीओतून समोर आले. काही तरूणांनी तर त्या पोलिसाला शिवीगाळही केली. हा संपूर्ण प्रकार काही लोकांनी कॅमेऱ्यात कैद केला. तर इतर काहींनी त्या तरूणांना रोखत मारहाण न करण्याचा सल्ला दिला. मात्र त्या तरूणांनी रस्त्यावरील त्या इसमांनाही उद्धटपणे उत्तर दिले.
त्या तरूणांनी धक्कादायकपणे कृती करत ड्युटीवर असलेल्या, वर्दी घातलेल्या त्या पोलिसाला अक्षरश: बेदम चोप दिला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर बराच गदारोळ माजला आहे. याप्रकरणी पुढील चौकशी करण्यात येत आहे.