मुंबई | 26 डिसेंबर 2023 : गुजराती चित्रपट दिग्दर्शक असल्याची बतावणी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या एका इसमाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. साजिद शेख असे आरोपीचे नाव असून मुंबई पोलिसांनी 25 डिसेंबर रोजी अटक केली. साजिद याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी साजिदला POCSO अंतर्गत अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडत मुलगी ही अल्पवयीन असून ती मूळची गुजरातची रहिवासी आहे. ती तिचे व्हिडीओ आणि रील्स बनवत असे आणि ते सोशल मीडियावर टाकत असे. 13 डिसेंबर रोजी पीडित मुलीच्या काकांनी तिची ओळख साजिद याच्याशी करून दिली. तो तिला अभिनय शिकवेल, चित्रपटात काम मिळवून देईल अशी त्याला अपेक्षा होती. पीडित मुलीच्या कुटुंबियांचा साजिद याच्यावर विश्वास होता, त्यामुळेच त्या इसमाने आपल्या पुतणीची साजिदशी ओळख करून दिली. मात्र त्यांच्या विश्वासाचा फायदा घेत साजिदने पीडित मुलीला 24 डिसेंबरला मुंबईत आणले.
हॉटेलमध्ये रूम बूक केली आणि…
मुंबईत आल्यानंतर साजिदने अंधेरी येथे एका हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि तेथे तो पीडित मुलीसह थांबला होता. 25 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास साजिद खानने अचानक मुलीच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडित मुलीने त्याला विरोध दर्शवला असता, तो थांबला आणि झोपून गेला. त्यानंतर पीडित मुलगी अतिशय घाबरली. ती त्याच वेळी खोलीतून बाहेर आली.
त्यानंतर तिने डी एन नगर पोलिसात जाऊन तक्रार केली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी साजिदविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्या हॉटेलमध्ये जाऊन तेथील खोलीतून साजिदला अटक केली .
आज साजिदला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला तुरुंगाची कोठडी देण्यात आली आहे, असे डीएन नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद कुरडे यांनी सांगितले.
सध्या साजिदने एकही चित्रपट केलेला नाही. आरोपी साजिद हा गुजराती चित्रपट दिग्दर्शक आहे की नाही, याचा तपास सुरू आहे.