Mumbai Crime : बुरखा घालून घरात घुसून मारायचे डल्ला, पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

| Updated on: Nov 15, 2023 | 11:47 AM

बुरखा घातलेले दोन लोक घरात घुसून दागिने आणि पैसे चोरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्याने या टोळीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकत अटक केली.

Mumbai Crime : बुरखा घालून घरात घुसून मारायचे डल्ला, पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
Follow us on

मुंबई | 15 नोव्हेंबर 2023 : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चोऱ्यांचे, घरफोडीचे सत्र वाढले आहे. मध्यंतरी दादर-माटुंगा परिसरात लेडिज गँगची दहशत पसरली होती. घरातील एकट्या, वयोवृद्ध व्यक्तींना हेरून, घरात घुसून मोबाईलसह मौल्यवान सामान आणि पैसे लुटणाऱ्या लेडीज गँगने धूमाकूळ घातला होता. अखेर तीन महिला आणि एका अल्पवयीन मुलीला पोलिसांनी अटक केली. मात्र आता बुरखा गँग मेंबर्सचा धूमाकूळ सुरू झाला. अखेर मुंबई पोलिसांनी बुरखा घालून चोरी करणार्‍या दोन चोरांना अटक केली आहे. अंधेरी एमआयडीसी परिसरात बुरखा घातलेले दोन लोक घरात घुसून दागिने आणि पैसे चोरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्यानंतर या टोळीचा पर्दाफाश झाला.

असा उघडकीस आला गुन्हा

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अंधेरीतील एमआयडीसी परिसरातील एका इमारतीत राहणारी महिला आपल्या लहान मुलीला शाळेत सोडण्यासाठी घरातून निघाली. तिने घराचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि मुलीला शाळेत नेले. मात्र घरी परत आल्यावर तिला घराचा दरवाजा सताड उघडा दिसल्याने ती घाबरली. लगेच आत जाऊन तिने पाहणी केली असता, घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे तिला आढळून आले.

तत्काळ कारवाई करत पोलिसांकडून शोध सुरू

त्यानंतर पीडित महिलेने जवळच्या एमआयडीसी पोलिस ठाण्या जाऊन चोरीची तक्रार नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३८० आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी त्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बुरखा घातलेल्या दोन महिला इमारतीत प्रवेश करताना आढळल्या. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता, बुरखा घातलेल्या व्यक्ती महिला नसून पुरुष असल्याचे उघड झाले.तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांकडून मिळालेली टीप याच्याआधारे पोलिसांनी शोध घेत दोन आरोपींना या चोरीप्रकरणी अटक केली. रईस अब्दुल शेख आणि वसीम खालिद खान अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत.

शेख आणि खान यांच्या अटकेने बुरखा टोळीच्या भीतीने जगणाऱ्या मुंबईतील लोकांना दिलासा मिळाला आहे. ही टोळी अनेक महिन्यांपासून कार्यरत होती आणि त्यांनी शहरात अनेक ठिकाणी हात मारत चोरी केल्याचे उघड झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून टोळीतील इतरही सदस्य आहेत का, याचाही शोध घेत आहेत.
तसेच सामान्य नागरिकांनी सतर्क रहावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसली तर त्यासदंर्भात पोलिसांना कळवावे, असेही आवाहन पोलिसांनी केले.