मुंबई : वडील एसटी महामंडळात कामाला. आई भाजी विकायचं काम करते. आईवडिलांना वाटलं होतं की मुलगा पोलीस बनेल. मुलगाही पोलीस भरतीसाठी (Maharashtra Police Recruitment 2022) मेहनत घेत होता. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. 22 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं एका क्षणात मृत्यू झाला. पोलीस भरती परीक्षेची (Police Recruitment Exam) तयारी करण्यासाठी धावण्याचा सराव करताना तरुणाचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. ही घटना वसईमध्ये घडली. मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव हृतिक महेंद्र मेहेर (Hritik Mahentra Meher) असं आहे. तो 22 वर्षांचा होता.
22 वर्षीय हृतिक मेहेर हा दुपारी 4 वाजता धावायला म्हणून रानगाव इथं किनाऱ्यावर गेला होता. पण 5 वाजण्याच्या सुमारास तो बेशुद्ध अवस्थेत किनाऱ्यावर आढळून आला. त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.
हृतिक मेहेर या तरुणाचं बीकॉम पर्यंत शिक्षण झालं होतं. पोलीस दलात भरती होण्याचं त्याचं स्वप्न होतं. त्यासाठी तो तयारीही करत होता. पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण देणाऱ्या एका अॅकेडमीतही त्याने प्रवेश घेतला होता.
नेहमीप्रमाणे धावण्याचा सराव करण्यासाठी हृतिक किनाऱ्यावर आला होता. पण आज धावताना त्याला अचानक उलट्यांचा त्रास सुरु झाला. त्यानंतर तो जागेवरच कोसळला आणि बेशुद्ध पडला, अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे.
महाराष्ट्रात लाखो तरुण हे पोलीस भरती परीक्षेची तयारी करत आहेत. 7 हजार जागांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत तरुणांना अर्जही करता येणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीची प्रतिक्षा असलेल्या तरुणांना अखेर आता संधी मिळणार आहे.
याच संधीचं सोनं करण्यासाठी हृतिक मेहनत घेत होता. पण त्याचं स्वप्न पूर्ण होण्याआधीच काळानं त्याच्यावर घाला घातलाय. अचानक झालेल्या मुलाच्या मृत्यूने त्याच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.