निनाद करमरकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, अंबरनाथ : सोमवारी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास अंबरनाथमध्ये (Ambernath Accident) एका स्कूल बसचा भीषण अपघात झाला. ही स्कूल बस (School Bus Accident) विद्यार्थ्यांनी भरलेली होती. 17 ते 18 विद्यार्थ्यांनी भरलेल्या या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काळजाचा थरकाप उडवणारा स्कूल बसच्या अपघाताचा व्हिडीओ (Accident CCTV Video) समोर आलाय. अंबरनाथच्या ग्रीन सिटी संकुलात स्कूल बस उलटली होती. या संकुलातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या अपघाताचा थरारक घटनाक्रम कैद झालाय.
ग्रीन सिटी संकुलात विद्यार्थ्यांना घेण्यासाठी स्कूल बस आली होती. पण एका उतारावर ही स्कूल बस रिव्हर्स येताना दिसते. रिव्हर्स येताना चालकाचं नियंत्रण सुटतं. बस कंट्रोल व्हावी म्हणून चालक स्टेअरींग फिरवतो. पण यामुळे अधिकच घोळ होतो.
Ambernath School Bus Accident CCTV | अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांना नेणारी स्कुलबस उलटली!#ambernath #accident #schoolbus pic.twitter.com/9k5CuuJgob
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 26, 2022
स्टेअरींग फिरवल्यानं स्कूल बस उतारावर असलेल्या एका कठड्याला धडकले आणि स्कूलबसला रस्त्यावरील बॅलन्स बिघडतो. तोल गेल्यामुळे स्कूल बस थेट चालकाच्या बाजूने पूर्णपणे कलंडते आणि जोरात रस्त्यावरच आदळली जाते. यावेळी जोरात आवाज झाल्यानं लोकांची घाबरगुंडी उडते. लोकंही स्कूल बसच्या दिशेने धाव घेतात.
या अपघातानंतर एक जण रस्त्यावर आडव्या झालेल्या बसवर चढला. बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना एक एक करुन त्याने बाहेर काढलं. सुदैवानं सगळे विद्यार्थी सुखरुप होते. पण अपघातामुळे त्यांचीही घाबरगुंडी उडाली होती.
काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झालीय. पण कुणालाही गंभीर स्वरुपाची इजा झाली नाही, अशी माहिती प्रदीप पवार यांनी दिली. गाडी वळवण्यासाठी चालक स्कूल बस मागे घेत होता, अशी माहिती स्थानिक रहिवासी हरप्रित सिंग यांनी दिली.
एका विद्यार्थ्यांला चालकाने मागे दगड लावण्यास सांगितलं होतं. पण यावेळी विद्यार्थी बाजूला सरकला. रिव्हर्स घेत असताना बस बंद पडली आणि चालकाचं नियंत्रण सुचलं. अखेर एका कठड्याला बस धडकली आणि हा अपघात घडला, असंही सिंग यांनी म्हटलंय.
दरम्यान, बसची चाकं पूर्णपणे झिजली असल्याचा आरोप हरप्रित सिंग यांनी केली आहे. त्यामुळे स्कूल बस किती सुरक्षित?, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. दुसरीकडे अपघात झालेली बस ही शाळेची बस नसून ती खासगी असल्याचं स्पष्टीकरण रोटरी शाळेच्या वतीने देण्यात आलंय. आता या अपघात प्रकरणी बस चालकावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.