अंबरनाथ (ठाणे) : आपल्यासोबत एखादी चुकीची घटना घडली की आपण न्याय मिळवण्यासाठी पोलीस ठाण्यात अर्ज देतो. सहसा पोलीस ठाण्यात आलेले हे अर्ज कालांतरानं अडगळीत जातात. मात्र अंबरनाथ पोलीस ठाण्यात याच तक्रार अर्जाचं निवारण करण्यासाठी दर शनिवारी तक्रार निवारण दिन ही मोहीम राबवली जाते. यात दोन्ही बाजूंच्या लोकांना बोलावून समज देऊन प्रकरण निकाली काढलं जातं. या अभिनव संकल्पनेमुळे गुन्हे कमी व्हायलाही मदत होतेय.
अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरवर्षी शेकडो गुन्हे नोंदवले जातात. एखादा प्रकार घडला, की नागरिक पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज घेऊन येतात. यापैकी काही अर्जांची चौकशी होऊन गुन्हे दाखल होतात. तर इतर अर्ज हे अडगळीत जातात. मात्र पोलीस ठाण्यात न्याय मिळेल या अपेक्षेनं आलेल्या कुणालाही रिकाम्या हातानं निराश होऊन परतावं लागू नये, यासाठी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे.
दर शनिवारी पोलीस ठाण्यात आलेले अर्ज पाहून दोन्हीकडच्या लोकांना बोलावलं जातं आणि समोरासमोर चर्चा घडवून ही प्रकरणं निकाली काढली जातात. यामध्ये नवरा-बायकोची भांडणं, सावकारी त्रास, शेजाऱ्यांनी भांडणं, फसवणूक, लुबाडणूक अशा अनेक प्रकरणांचा समावेश असतो. विशेष म्हणजे महिलांशी संबंधित तक्रारींसाठी दोन शनिवार राखीव ठेवले जातात.
पोलिसांना एखाद्या प्रकरणात थेट गुन्हा दाखल करण्याचेही अधिकार असतात. मात्र काही प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झाला, तर त्याचा परिवारावर, नात्यांवर विपरीत परिणामही होऊ शकतो. त्यामुळेच अशी प्रकरणं चर्चेनं सोडवली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अंबरनाथ पोलिसांनी सुरु केलेल्या या उपक्रमामुळे गुन्हे दाखल होण्याचं प्रमाणही काही अंशी कमी होत आहेत. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी कमी होतेय. तसेच कोर्टात चक्र मारण्यापेक्षा समुपदेशन आणि सामोपचारानं प्रकरणं मिटवण्याकडे पोलिसांचाही कल वाढताना दिसतोय.
हेही वाचा :
शेजारच्या तरुणाकडून वारंवार छेडछाड, अल्पवयीन मुलीचं टोकाचं पाऊल, आई-वडिलांचा आक्रोश
लोकांच्या दुचाकी पळवायचा, पेट्रोल संपलं की तिथेच सोडायचा, चोराचं चोरीचं कारण ऐकून पोलीसही चक्रावले