निनाद करमरकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambernath School Bus accident) स्कूल बसचा सोमवारी सकाळी अपघात (Road accident News) झाला. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. या स्कूलमध्ये 17 ते 18 विद्यार्थी होते. या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना अपघाताबाबत कळल्यानंतर त्यांना धक्काच बसला.
अंबरनाथच्या ग्रीन सिटी संकुलामध्ये (Green City Complex) सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला. स्कूल बस उलटल्यानंतर तातडीने स्थानिकांनी अपघातग्रस्त बसमधून विद्यार्थ्यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढलं. त्यानंतर क्रेनच्या मदतीने पलटी झालेली स्कूल बस हटवण्यात आली.
या अपघातामुळे स्कूल बसची वाहतूक करणाऱ्यांवर पुन्हा एकदा सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहे. शाळेत मुलांना स्कूल बसने पाठवावं की नाही, असा प्रश्न आता पालकांना पडलाय. या अपघातानंतर स्कूल बसचा चालक आणि मालक यांच्यावर संकुलातील लोकांनी संताप व्यक्त केला. या अपघाताला जबाबदार कोण, यावरुन काही काळ बाचाबाची देखील झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
चालकाच्या बेजबाबदार ड्रायव्हिंगमुळे हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात आलाय. या अपघातानंतर ग्रीन सिटी संकुलातील लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. स्कूल बसच्या मालकाला धारेवरही धरण्यात आलं. यावेळी स्थानिक आणि स्कूल बस चालकांमध्ये बाचाबाचीही झाली.
एका उतारावर स्कूल बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला, असं प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. पण हा अपघात रोखता आला असता, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. ग्रीन सिटी संकुलात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघात कैद झाल्याचा दावा स्थानिकांनी केलाय.
अपघात कुणामुळे घडला, हे सीसीटीव्ही फुटेजमधून सिद्ध होईल, असं म्हणत स्थानिकांनी स्कूल बस चालक आणि मालकाला सुनावलं. चूक झाल्याचं कबूल करण्यास स्कूल बस चालक-मालकानं नकार दिल्यानं यावेळा शाब्दिक चकमक उडाली.
मुंबईतील सांताक्रूझमध्ये एक स्कूल बस काही तास गायब असल्याची घटनाही याच वर्षी समोर आली होती. तसंच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघात घडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यामुळे ज्या स्कूल बस चालकांवर भरवसा ठेवून पालक विश्वासने आपल्या मुलांना शाळेत पाठवतात, त्यांच्या विश्वासार्हतेवरच या घटनेनं सवाल उपस्थित केले जात आहेत. पालकांची चिंता अशा घटनांमुळे वाढवलीय.