मुंबई : अनिल देशमुख, संजीव पालांडे यांच्या पाठोपाठ देशमुख यांचे खाजगी सचिव कुंदन शिंदे यांना देखील मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला. एक लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र जामीन मिळाल्यानंतरही शिंदे यांचा तुरुंगवास कायम आहे. शिंदे यांना ईडी प्रकरणात जामीन मिळाला आहे, मात्र सीबीआय प्रकरणात अद्याप जामीन मिळू न शकल्याने शिंदे यांची तूर्तास तुरुंगातून सुटका नाही. यापूर्वी अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांनाही मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे. मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टाचे सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी कुंजन शिंदे यांच्या जामीनावर आपला निकाल दिला निकाल देताना कुंदन शिंदे यांना ईडी प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला.
जामीन मंजूर करताना कोर्टाने शिंदे यांना काही अटी आणि शर्थी घातल्या आहेत. कुंदन शिंदे यांना एक लाखाचा जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र त्यांना प्रत्येक बुधवारी ईडी कार्यालयात हजर राहावं लागेल.
तसेच पासपोर्ट जमा करावा लागेल. न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुंबई बाहेर जाऊ शकणार नाही. या प्रकरणांमध्ये अनिल देशमुख आणि संजीव पालांडे या दोघांना देखील जामीन मिळालेला आहे. त्याच आधारावर मुंबई सत्र न्यायालयाने आज कुंदन शिंदे यांना जामीन मंजूर केला आहे.
कुंदन शिंदे यांना सीबीआय प्रकरणात अद्याप जामीन मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना तुरुंगातच रहावं लागेल, अशी माहिती अॅड. इंद्रपाल सिंग यांनी सांगितले. उद्या सीबीआय प्रकरणात कुंदन शिंदे यांच्या जामीनावर सुनावणी आहे.
कोर्टात आम्ही आमची बाजू मांडणार आहोत, मात्र आम्हाला विश्वास आहे ज्या प्रकारे अनिल देशमुख आणि संजीव पालांडे यांना जामीन मिळालेला आहे, त्याच आधारावर सीबीआय कोर्टात सुद्धा कुंदन शिंदे यांना जामीन मिळणार आहे. कदाचित एक आठवडा किंवा काही दिवसांनी कुंदन शिंदे हे तुरुंगातून बाहेर येतील, असा विश्वास अॅड. सिंग यांनी व्यक्त केला.