बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची बातमी समोर आली आहे. या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असून एक पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आज पहाटे ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन हा प्रकार केल्याचं सांगितलं जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच त्याचा एन्काऊंटर केल्याने अक्षयचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही घटना ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
अक्षय शिंदे याची बदलापूर बलात्कार प्रकरणात चौकशी सुरू आहे. एसआयटीकडून त्याची चौकशी सुरू आहे. त्याला कोठडीही देण्यात आली होती. त्यामुळे त्याला तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. मात्र, आणखी एका गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यासाठी बदलापूर पोलीस आज तळोजा येथे आले होते. सकाळी 5.30 वाजता पोलीस तळोजा कारागृहात पोहोचले होते. अक्षयचा ताबा घेऊन त्याला बदलापूरकडे नेत असताना ठाण्याच्या हद्दीत अक्षयने पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर सेल्फ डिफेन्ससाठी गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र, पोलिसांनी या वृत्ताला अद्याप दुजोरा दिला नाही. या झटापटीत एका पोलिसालाही गोळी लागल्याने हा पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसाची प्रकृती गंभीर आहे.
अक्षयने व्हॅनमध्येच पोलिसांवर गोळीबार केला. त्याने तीन राऊंड फायर केलं. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याने पोलिसांच्या पायांवर गोळीबार केला. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. कळवा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याचंही सांगितलं जात आहे.
दरम्यान, अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अक्षयने स्वत:वर गोळी झाडली की आणखी काही दुसरं आहे. त्याला कोणी गोळी घातली की आणखी काही आहे? याची सीबीआयकडून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
तर, या प्रकरणाचे धागेदोरे आरएसएसपर्यंत गेले आहेत. या प्रकरणातील आऱोपी फरार आहेत. त्यामुळे पुरावे नष्ट करण्याचा हा प्रकार तर नाही ना? असा संशय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. मात्र, आपण कोणत्याही निष्कर्षापर्यंत येणार नसल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.