ठाणे: टिटवाळा पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. खबऱ्यांनी दिलेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्याला पकडलं आहे. आश्चर्य म्हणजे या 37 वर्षीय चोरट्यावर चोरीचे तब्बल 37 गुन्हे दाखल आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांना हवा असलेला हा चोरटा अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे.
सोहेल दिवाकर असं या चोरट्याचं नाव आहे. खबऱ्यांनी दिलेली माहिती आणि एका गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज चेक करत असताना सोहेलचा सुगावा लागला आणि त्याला जेरबंद करण्यात आलं. त्याच्याकडून वाशिंद आणि भिवंडी परिसरातील सहा मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
काही दिवसापूर्वी टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी लंपास झाली होती. याच गुन्ह्याचा टिटवाळा पोलीसांच्या पथकाने तपास सुरु केला असता तो चोरटा एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. मात्र फुटेज अस्पष्ट होते. हे सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदाराच्या मार्फत पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. या चोरट्याची पोलिसांनी ओळख पटवली असता हा सराईत गुन्हेगार सोहेल दिवाकर असल्याचे पोलीस तपासात समोर आले. पोलिसांनी सोहेलचा शोध सुरू केला. मात्र सोहेल आपली राहण्याची ठिकाण बदलत होता. अखेर हा चोरटा मीरा रोड परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मीरा रोड येथे सापळा रचत सोहेलला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस चौकशी दरम्यान सोहेलने टिटवाळा जवळ असलेल्या बल्यानी येथे एक घर भाड्याने घेतले होते. या घरात त्याने चोरी केलेल्या 6 गाड्या लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल व 6 दुचाक्या आतापर्यत हस्तगत केल्या आहेत. सोहेलने पाच दहा नव्हे तर 37 ठिकाणी दुचाक्या चोरी केल्याचेही तपासात समोर आले आहे. त्याच्याविरोधात भिवंडीतील पडघा येथे 8, गणेशपुरीत 4, भिवंडी शहरात 8, शांतीनगरमध्ये 4, भोईवाड्यात 2 असे 34 गुन्हे एकट्या भिवंडी तालुक्यात दाखल आहेत. तर शहापूरमध्ये 2, वाडा, वाशिंद आणि जव्हार येथे प्रत्येकी एक असे एकूण 37 गुन्हे दाखल आहेत. याआधी देखील चोरीच्या गुन्ह्यात सोहेलला अटक झाली होती. मात्र जामिनावर सुटून आल्यानंतर त्याने पुन्हा चोरी करण्यास सुरुवात केली होती. मात्र या सराईत चोरट्याला अटक करण्यात अखेर टिटवाळा पोलिसांना यश आले आहे.
VIDEO : महत्त्वाच्या घडामोडी | 18 December 2021#FastNews #Newshttps://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/ka62YJvtyt
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 18, 2021
संबंधित बातम्या: