मुंबई : भाजप नेते राम कदम यांनी अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात अटकेत असलेला उद्योपती राज कुंद्रावर गंभीर आरोप केले आहेत. कुंद्राने एका प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्रीचं शारीरिक शोषण केल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. तसेच पीडित मॉडेलने पोलिसात तक्रार केली तेव्हा तिच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला, असाही दावा राम कदम यांनी केला आहे. कदम यांनी आज (30 जुलै) पत्रकार परिषद घेऊन राज कुंद्रावर गंभीर आरोप केले आहेत.
“14 एप्रिल 2021 रोजी एका प्रसिद्ध मॉडेलने मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यात राज कुंद्राच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या मॉडेलने आपल्या तक्रारीत राज कुंद्राने शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला होता. पण ही तक्रार पुढे जाऊ शकली नाही. या तक्रारीवर पुढे कारवाई होऊ शकली नाही. याशिवाय या मॉडेलवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. अभिनेत्रीला तक्रार मागे घेण्यासाठी भाग पाडायला लावणारे नेमके कोण होते ते आता राज्य सरकारने सांगावं”, असं राम कदम म्हणाले.
“राज कुंद्राने जवळपास 3 हजार कोटींचा घोटाळा केला आहे. वियान इंडस्ट्रिज लिमिटेड कंपनीने ऑनलाईन गेमची सुरुवात केली होती. या गेमचं नाव गेम ऑफ डॉट असं होतं. राजने या गेमच्या नावाखाली डिस्ट्रिब्यूटर्ससोबत फ्रॉड करुन कोट्यवधी रुपये कमावले. विशेष म्हणजे त्याने पैसे कमावल्यानंतर सगळ्यांशी संबंध तोडले. राज कुंद्राने आपली पत्नी शिल्पा शेट्टीचा हा गेम फॉर्वर्ड करण्यासाठी वापर करत डिस्ट्रिब्यूटर्सला आकर्षित केलं. तसेच फ्रॉड केल्यानंतर याच लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला”, असा दावा राम कदम यांनी केला.
“या प्रकरणी पुढच्या तीन दिवसात योग्य ती कारवाई झाली नाही तर आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ. यासाठी पोलीस आयुक्त आणि गृह मंत्रालयाला विनंती करु. याशिवाय लोकांवर होणारा इतका अन्याय सरकारने सहन तरी कसा केला?”, असा त्यांनी केला.
ठाण्याचे डिस्ट्रिब्यूटर राजू नायरने देखील आपली प्रतिक्रिया केली. “मी माझ्या काही मित्रांसोबत मिळूण 10 लाख रुपये लावले होते. त्यातून आम्हाला चांगले पैसे मिळतील अशी आशा होती. आम्हाला 25 लाख रुपये देण्यास सांगितलं गेलं होतं. पण आम्ही 10 लाख रुपये जमवू शकलो. यामध्ये शिल्पा शेट्टीचं नाव आहे म्हणजे आम्हाला नक्की फायदा होईल, असं आम्हाला वाटलं”, असं नायर म्हणाले.
“आमची राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी दोघांसोबत भेट झाली नाही. आम्ही फक्त मॅनेजरला भेटायचो. त्याच मॅनेजरने आम्हाला गेम संदर्भात माहिती दिली होती. पैसे दिल्यानंतर तीन महिन्यांनी आमची फसवणूक झाली आहे हे आमच्या लक्षात आलं. आम्ही अनेकदा तिथे गेलो आणि संबंधितांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऑफिसमधला कुणीही अधिकारी आम्हाला भेटला नाही. त्यानंतर आम्ही पोलिसात गेलो. त्यांनी आम्हाला पैसे परत मिळतील, असं आश्वासन दिलं. मात्र नंतर तक्रार आमच्यावर दाखल करण्यात आली”, असं राजू नायर यांनी सांगितलं.
सोलापूरचे डिस्ट्रिब्यूटर संतोष मोरे यांनी देखील आपल्या व्यथा मांडल्या. “शिल्पा शेट्टीचं नाव ऐकूण मी देखील पैसे गुंतवले. मी चेकद्वारे सात लाख रुपये दिले. या गेमचा चांगला फायदा होईल आणि सर्व गोष्टी अधिकृत आहे, असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. आम्हाला मोठी स्क्रिन आणि कम्प्युटर देण्याची देखील भाषा झाली होती. याशिवाय पैसे हवे तेव्हा परत मिळू शकतात, असं सांगण्यात आलं होतं. पण काही दिवसांनी आमची फसवणूक झालीय हे आमच्या लक्षात आलं. आम्ही जेव्हा आमचे पैसे घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो तेव्हा धक्के मारुन आम्हाला बाहेर काढण्यात आलं. आम्हाला आमचे पैसे परत मिळाले नाहीत”, अशा शब्दात सोलापूरचे संतोष मोरे यांनी व्यथा मांडली.
संबंधित बातमी :
‘आम्हाला नोटीस देणं आवश्यक होतं, आमची अटक बेकायदेशीर’, राज कुंद्राच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद