मुंबई : नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित परिसरात गटारीत निळ्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पुरुष मृतदेहाचे तुकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित मृतदेह हा 30 ते 35 वयाच्या व्यक्तीचे असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह वाशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
एपीएमसी परिसरात गटारीत असलेल्या एका निळ्या पिशवीत सकाळपासून दुर्गंध येत होता. सुरुवातीला ये-जा करणाऱ्या नागरिकांनी दुर्लक्ष केलं. मात्र, हा दुर्गंध नकोसा झाल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतं पिशवी उघडली. त्यावेळी संबंधित निळ्या पिशवीत पुरुष मृतदेहाचे तुकडे आढळले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह वाशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. संबंधित मृतदेह नेमका कुणाचा आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी एपीएमसी पोलीस डॉग स्कॉड यांच्याकडून तपास करण्यात येतोय. पोलीस अनेक बाजूंनी तपास करत आहेत. तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का? त्याचीदेखील शहानिशा पोलीस करत आहेत.
दुसरीकडे धुळ्यातही अशीच काहिशी घटना समोर आली आहे. धुळ्यात एका 80 वर्षीय आजीचा मृतदेह एका गटातील कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या आजी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यांचे कुटुंबिय गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते. त्यानंतर आजीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरातील नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. स्थानिक नागरिकांना मृतदेह दिसल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात संबंधित मृतदेह हा 80 वर्षीय आजी कस्तुराबाई वानखेडे यांचा असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन दिवसांपूर्वी कस्तुराबाई या विष्णूनगर देवपूर येथून अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचे कुटुंबिय त्यांचा शोध घेत होते. पण कस्तुराबाई यांचा तपास लागत नव्हता. अखेर कुटुंबियांनी देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस आणि कुटुंबिय आजींचा शोध घेतच होते. तसेच परिसरातील इतर नागरिक वानखेडे कुटुंबियांचे नातेवाईक सर्वच आजीचा शोध घेत होते. या दरम्यान आज (12 सप्टेंबर) दुपारच्या सुमारास आंबेडकर शाळेजवळ चंदन नगर परिसरात एका गटारीत एका वृद्धेचा मृतदेह आढळला.
तसेच नाशिक जिल्ह्यात दगडाच्या बंद खाणीतील तळ्यात एकाच कुटुंबातील 3 मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृतकांमध्ये एका पुरुषासह दोन लहान मुलांचा समावेश होता. या घटनेमागे नेमकं कारण काय ते समजू शकलं नव्हतं. पण पित्याने आपल्या दोन मुलांसह बंद खाणीतील तळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय होता. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :
हातोड्याच्या धाकाने स्कायवॉकवरुन मित्रांना पळवलं, शिर्डीहून आलेल्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार
प्रसुतीसाठी दाम्पत्य हॉस्पिटलला, चोरट्याची घरफोडी, दोन फेऱ्यात अर्ध-अर्ध सामान नेलं