मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री नबाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र सुनावणी दरम्यान कोर्टाने त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी करण्यास नकार दिला. मलिक यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर ईडीला आपलं उत्तर दोन आठवड्यात दाखल करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. यादरम्यान काही आवश्यक वाटल्यास मलिक यांना सुट्टीकालीन कोर्टात दाद मागण्याची मुभा दिली आहे. जामिनावर तातडीची सुनावणीस नकार दिल्याने मलिक यांचा नाताळ आणि नववर्ष तुरुंगातच होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या कोर्टासमोर आज सुनावणी झाली. त्या दरम्यान मलिक यांच्या वतीने अॅड. अमित देसाई यांनी नवाब मलिक यांची एक किडनी निकामी झाल्याचे सांगितले. ते सध्या एकाच किडनीवर आहेत. तरी देखील ईडी त्यांच्या डिस्चार्जसाठी घाई करत आहे.
यावर नवाब मलिक यांची वैद्यकीय अवस्था गंभीर असेल आणि जर ते उपचार कैदेत असताना शक्य नसतील तरच तातडीची सुनावणी घेऊ. जर याचिकाकर्ता बऱ्याच काळापासून रूग्णालयात दाखल आहे तर घाई काय आहे? असा प्रश्न न्यायालयाने केला.
नवाब मलिक सध्या कुर्ला स्थित क्रिटी केअर या खाजगी रुग्णालयात दाखल आहेत. अॅड. अमित देसाई यांनी मलिक यांच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी आम्हाला दुसऱ्या मोठ्या रूग्णालयात उपचार सुरू करायचे आहेत असे सांगितले. पण न्यायालयाने तातडीची सुनावणी करण्यास नकार देत 6 जानेवारी रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.
तुमच्या व्यतिरिक्त इतर लोक सुद्धा आहेत ज्यांच्या अर्जावर सुनावणी करायची आहे, असेही पुढे कोर्ट म्हणाले.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरसोबत जमिन प्रकरणात केलेल्या आर्थिक व्यवहारामुळे मलिक यांना तुरुंगात जावं लागलं. कारण हसीना पारकरचा मुलगा अलिशाह पारकर यांनी गोवावाला कंपाऊंडचा काही भाग नवाब मलिक यांना विकल्याचा खुलासा केला होता.
पुढील तपासात नवाब मलिक यांना फेब्रुवारी महिन्यात ईडीने मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. 30 नोव्हेंबर रोजी मुंबई सत्र विशेष न्यायालयाने मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.