मुंबई : आजकाल लहान मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना मुंबईत घडली होती. शाळकरी मुलीची ओढणी खेचल्याप्रकरणी (Molestation of School Girl) मुंबईतील विशेष न्यायालयाने (Special Court Mumbai) एका 20 वर्षीय तरुणाला तीन वर्षाची कारावासाची शिक्षा (Three Year Imprisonment) सुनावली आहे. विशेष न्यायाधीश प्रिया बनकर यांनी मंगळवारी निकाल देताना कलम 354, कलम 506 अन्वये आणि पोस्को कायद्यानुसार दोषी ठरवत शिक्षा सुनावली. अशा घटनांचा पीडितेवर खोलवर परिणाम होतो आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा फटका बसत असल्याचे मत यावेळी न्यायालयाने नोंदवले आहे.
घटनेतील आरोपी पीडित मुलीच्या घराबाहेर उभा रहायचा. घटनेच्या दिवशीही आरोपी मुलीच्या घराबाहेर उभा होता. पीडित मुलगी घराजवळच्या दुकानात जाण्यासाठी घराबाहेर पडली असता आरोपीने तिची ओढणी खेचली आणि हातही धरला. इतकेच नाही तर तिच्या वडिलांनाही मारण्याची धमकी दिली.
घटना घडली तेव्हा मुलगी 15 वर्षाची होती आणि इयत्ता दहावीत शिकत होती. घटनेप्रकरणी मुलीच्या वडिलांनी माहिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. खटल्याच्या सुनावणीदरम्यान मुलगी, तिचे वडिल आणि प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याच्या जबाबाची दखल घेतली.
लहान मुलांवरील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी 2012 मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाने लैंगिक छळ, लैंगिक शोषण आणि पोर्नोसारख्या जघन्य गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी याची निर्मिती केली होती.
या कायद्यांतर्गत 12 वर्षांखालील मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे. लहान मुलांवरील वाढते गुन्हे पाहता पोस्को कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.