मुंबई : मुंबईतील ट्रॅफिक सिग्नलवर श्रीमंत कार चालकाला लुटणाऱ्या टोळीतील तीन सदस्यांना बोरिवली एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे. नितेश कुशीर गोहिल, चेतन डेव्हिड मकवाना, कैलास सुरेश केनी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी ट्रॅफिकमध्ये किंवा सिग्नलवर उभ्या असलेल्या चालकांना हेरुन लुटायचे. अखेर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी हे मुंबईतील कोणत्याही ट्रॅफिक किंवा सिग्नलजवळ उभे रहायचे. या टोळीतील एक व्यक्ती गाडीत काही सामान ठेवलेल्या अशा लोकांच्या गाडीला जाऊन धडकत असे.
धक्का लागला म्हणून मग भांडण व्हायचे. यावेळी गाडी चालकाचे लक्ष विचलित होताच त्याचे बाकीचे साथीदार यायचे आणि गाडीत ठेवलेला माल किंवा मोबाईल घेऊन पळून जायचे.
मंगळवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास एपीआय सूर्यकांत पवार त्यांच्या टीमसह बोरिवली पश्चिमेकडील बीएमसी कार्यालयाजवळ राऊंड मारत होते. यावेळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
वाहतूक कोंडी दरम्यान सूर्यकांत पवार आणि त्यांच्या पथकाने तिन्ही आरोपींना एका कार चालकाशी भांडताना पाहिले. याचवेळी आरोपींनीही पोलिसांना पाहिले आणि तेथून पळ काढला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
आरोपींकडून दोन मोबाईल आणि एक धारदार चाकू जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली सपोनि सूर्यकांत पवार, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस हवालदार खोत, पोलीस शिपाई सावळी, पोलीस शिपाई मोरे यांनी आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले.