मुंबई : शंभर कोटी कथित घोटाळा (Scam) प्रकरणात सीबीआयकडून आरोपपत्र (Chargesheet) दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सीबीआयने 49 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयकडून या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख, कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुख्य आरोपी म्हटले आहे. या प्रकरणात सचिन वाझे (Sachin Vaze)ला माफीचा साक्षीदार होण्याकरीता विशेष सीबीआय कोर्टाने मान्यता दिली आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबईतील बार अँड रेस्टॉरंट मालकांकडून शंभर कोटी वसुली करण्याचे टार्गेट निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना देण्यात आले होते, असा आरोप केला होता. यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यात यावा याकरीता अॅडव्होकेट जयश्री पाटील यांनी मागणी केली होती. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणात कारवाई सुरू केली असता चार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली होती. या प्रकरणात सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुख्य आरोपी म्हटले आहे तर सहआरोपी सचिन वाझे यांना याप्रकरणात माफीचा साक्षीदार झाल्यामुळे त्यांच्याविरोधात सीबीआयने आज दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात उल्लेख केलेला नाही. (CBI files chargesheet in alleged Rs 100 crore scam)