मुंबई | 5 नोव्हेंबर 2023 : आशियातील श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना धमकीचे ईमेल गेल्या आठवड्यात आले. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी शनिवारी तेलंगाणा आणि गुजरातमधून दोन तरुणांना अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या, क्राईम इंटेलिजेंस युनिटने ही कारवाई केली. गुजरातमधील गांधीनगरमधील कल्लोल येथील राजवीर खंत नावाच्या 21 वर्षीय तरुणाला अटक केली. खंत याने shadabchan@mailfence.com या ईमेलवरुन त्याने शादाब खान या नावाने हा धमकीचा मेल पाठवाला आणि खंडणी मागितली होती.
बेल्जियम कनेक्शन का?
आरोपींनी त्यांना 27 ऑक्टोबर रोजी 20 कोटींच्या खंडणीसाठी पहिला ई-मेल पाठवला. त्यात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी 200 कोटींची मागणी करण्यात आली. तिसरा मेल 30 ऑक्टोबर रोजी आला. थेट 400 कोटींची खंडणी मागितली. पुन्हा दोन दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली. पोलिसांनी तपास केल्यानंतर त्याचे बेल्जियम या देशाशी कनेक्शन दाखवत होते. ई-मेल पाठवण्यासाठी आरोपी व्हीपीएन मास्किंगचा वापर करत असल्याने बेल्जियम लोकेशन दिसत होते.
Dark Web म्हणजे काय
राजवीर खंत हा कम्प्यूटर सायन्सच्या अंतिम वर्षात शिकत आहे. डार्क वेबसाठी तो तासन तास संगणक वापरत होता. डार्क वेब इंटरनेटचाच एक भाग आहे. याठिकाणी सर्च इंजिन पोहचत नाही. हे एक खास वेब ब्राऊजर आहे. Kasperksy याच्या मते हे डीप वेबचाच प्रकार आहे. सर्च इंजिन त्याचे इंडेक्स करु शकत नाही. डार्क वेब हे अत्यंत धोकादायक मानण्यात येते. मोठे सायबर गुन्हे याच माध्यमातून करण्यात येतात.
मुंबईतील गावदेवी पोलिसांनी सकाळीच तेलंगाणातील 19 वर्षीय गणेश रमेश वनपारधी याला अटक केली. तो बीकॉमच्या द्वितीय वर्षाला शिकत आहे. वानपारधी याने मुकेश अंबानी यांना धमकीचा ईमेल पाठवत खंडणी मागितली होती. वानपारधीने टीव्हीवर मुकेश अंबानी यांना धमकी देण्यात आल्याचे वृत्त पाहिले. त्यानंतर त्याने पण ई-मेल पाठवला. पण त्याला ही गंमत चांगलीच महागात पडली.