मुंबई : चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका विद्यार्थीनीची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. ज्याने या तरुणीची हत्या केली. त्याचा मृतदेहही रेल्वेरुळावर आढळला आहे. चर्चगेटसारख्या गजबलेल्या भागात झालेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजप नेत्या आणि भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज या वसतिगृहाला भेट दिली. यावेळी विद्यार्थीनींनी त्यांच्याकडे तक्रारीचा पाढाच वाचला. आरोपीचं वागणं बरोबर नव्हतं. त्याची नजरही चांगली नव्हती, असं या विद्यार्थींनीनी म्हटल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलं.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हॉस्टेलमध्ये जाऊन हॉस्टेलची पाहणी केली. तसेच हॉस्टेलमधील विद्यार्थींनीशी संवाद साधून त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली. तसेच त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी चर्चा करून त्यांच्याकडूनही घटनेची माहिती घेतली. त्यानंतर चित्रा वाघ यांनी मीडियाशी संवाद साधत संताप व्यक्त केला. ही घटना अतिशय संतापजनक आहे. अत्यंत क्रूरपणे या मुलीची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. ही इमारत धोकादायक आहे. इमारतीतून या मुलींना इतरत्र हलवण्यात येणार होते, अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली.
आरोपी धोबी होता. आधी तो इथे धोब्याचं काम करत होता. त्याच्यावर सगळयांचा विश्वास होता म्हणून त्याला वॉचमनचं काम दिलं होतं. मी विद्यार्थीनींशी संवाद साधला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या आरोपीचं वागणं बरोबर नव्हतं. त्याची नजर चांगली नव्हती, असं सांगतानाच जो धोब्याचं काम करायचा त्याला वॉचमनचा काम कसं देण्यात आलं? कोणी परवानगी दिली?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
या इमारतीत फक्त ग्राऊंड फ्लोअरलाच सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. इतर सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. हा निगलीजन्स कोणाचा? या वॉर्डन आणि अधिकाऱ्यांनी मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायला हवी होती. मुलींच्या सुरक्षेच्या संदर्भात कठोर पाऊल उचलले जातील. त्या माणसाने स्वतः ला संपवलं आहे. पण या प्रकरणाची आता कसून चौकशी करणे गरजेच आहे, असं त्या म्हणाल्या. मंत्री चंद्रकांत दादा पाटील दौऱ्यावर आहेत. पण ते घटनेची अपडेट घेत आहेत.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानाचाही समाचार घेतला. सुप्रिया सुळे या मोठ्या नेत्या आहेत. मला या घटनेला राजकीय वळण द्यायचं नाही. पण मोठ्या नेत्या अशा घटनेमध्येही राजकारण कसं आणू शकतात? एका लेकीचा जीव गेला आहे. सुप्रियाताई संवेदनशीलता बाळगा, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
तुमचं सरकार असताना हॉस्टेलमध्ये सीसीटीव्ही नाहीत म्हणून हॉस्टेलने पत्र पाठवलं होतं. सरकार म्हणून आम्ही ज्यांचा निगलिजन्स आहे त्यांच्यावर कारवाई करूच. माझं या मुलीच्या मैत्रिणीशी बोलणं झालं. या मुलीने तिच्या मैत्रिणीला सांगितलं होतं की, माझ्या सोबत या विकृत माणसाने याआधी घाणेरडा प्रकार केला होता. मात्र तिने ही तक्रार वॉर्डनकडे केली नाही. जर तक्रार केली असती तर आज तिचा जीव वाचला असता. मे महिन्यापासून या मुलीला त्रास दिला जात होता, अशी माहितीही त्यांनी दिली.