मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या जामिनावर आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्या कथित भेटी संदर्भातले तांत्रिक पुरावे योग्यरित्या अभ्यास करून सादर करण्याचे निर्देश एनआयएला दिले आहेत. सुनावणीवेळी एनआयएने प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्या कथित भेटीचे पुरावे सादर करण्याचा प्रत्न केला. मात्र शर्मा यांच्या वकिलाने विरोध केला. या प्रकरणावर उद्या देखील सुनावणी होणार आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्मा यांच्या जामिन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
सुनावणी दरम्यान एनआयएतर्फे प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांची कथित भेट झाल्याचे पुरावे, मोबाईल लोकेशन कोर्टात देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला प्रदीप शर्मा यांचे वकील अॅड. आबाद पोंडा यांनी विरोध केला. मुंबई उच्च न्यायालयाने यानंतर तांत्रिक पुरावे योग्य अभ्यास करून सादर करा, असे निर्देश दिले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती आर एन लोढा यांच्यात खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यादरम्यान आज कोर्टासमोर प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्या मोबाईल टॉवर लोकेशन कंपनीच्या टेक्निकल एक्सपर्टला सुद्धा हजर करण्यात आले.
मात्र न्यायालयाने एएसजी अनिल सिंग यांना सांगितलं की, तुम्ही या संदर्भातली सर्व माहिती आधी स्वतः समजून घ्या,या त्यानंतर कोर्टाकडे माहिती सादर करा. या प्रकरणात एनआयएचा दावा आहे की, प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे हे नियमित संपर्कात होते आणि टेक्निकल पुरावाच्या आधारे एनआयएने हा दावा केला आहे.
मात्र टॉवर लोकेशन आणि परिसरातील अंतर यात तफावत असल्याचा युक्तीवाद शर्मा यांचे वकील आबात पोंडा यांनी केला. एनआयएतर्फे केलेला दावा खोडून पोंडा यांनी खोडून काढला.
या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल समीर गावकर, पंकज भोसले यांच्या जबाबाच्या आधारे अॅड. अनिल सिंग यांनी दावा केला. मात्र कोर्टाने या प्रकरणात येताना उद्या सर्व माहिती घेऊन कोर्टासमोर उत्तर सादर करण्याचे निर्देश एनआयएला दिले आहेत.
या प्रकरणात प्रदीप शर्मा यांचे वकील आबाद पोंडा यांनी सादर केलेल्या फोन लोकेशन आणि सीडीआर संदर्भात एनआयएला खुलासा करण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते.
एनआयएने सादर केलेल्या लोकेशन संदर्भात जो दावा करण्यात आलेला आहे, त्यात तथ्य नसल्याचा दावा प्रदीप शर्मा यांचे वकील आबाद पोंडा यांनी केला.