मुंबई : दिशा सालियन (Disha Salian Death case) मृत्यूप्रकरणी मोठा खुलासा करण्यात आलाय. दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच असल्याचं सीबीआयनं (CBI) आपल्या अहवालातून स्पष्ट केलंय. गेल्या दोन वर्षात दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरुन राजकारण तापलं होतं. आरोप प्रत्यारोप केले जात होते. त्यानंतर अखेर हे प्रकरणी सीबीआयकडे वर्ग करण्यात आलेलं. दरम्यान, आता सीबीआय तपासातून महत्त्वाची माहिती समोर आलीय. दिशा सालियन मृत्यू प्रकरण हे सुशात सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाशी (Sushant Singh Rajput Death Case) जोडलं जात होतं. मात्र दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय.
28 वर्षीय दिशा सालियन ही मालाड येथे राहत होती. मालाड येथील गॅलेक्सी रिजंट या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन दिशा सालियन खाली कोसळली होती. यात तिचा जागीच मृत्यू झाला होती. ही घटना 8 जून आणि 9 जूनच्या मध्यरात्री 2020 साली घडली होती.
महत्त्वाचं म्हणजे दिशा सालियनच्या मृत्यूनंतर पाच दिवसांनी सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्याच्या वृत्तानं मोठीच खळबळ उडाली होती. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी या दोन्ही मृत्यूंचा एकमेकांशी संबंध असल्याचा आरोप केला होता.
दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांनी एकमेकांसोबत काम केलं होतं. त्यामुळे या दोन्हीही घटनांचा एकमेकांशी जवळचा संबंध असल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला होता. मात्र अखेर सुशांत सिंह राजपूत यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणीही ती आत्महत्याच होती, असं तपासाअंती स्पष्ट झालं, तर आता दिशा सालियन हिचा मृत्यूही देखील एक अपघात होता, असं सीबीआयच्या अहवालातून समोर आलंय.
हा अहवाल समोर आणण्याआधी सीबीआयकडून सखोल तपास करण्यात आला होता. फॉरेन्सिक चाचण्यांचे अहवाल, चौकशी केलेल्यांच्या साक्षी, संपूर्ण घटनाक्रम, वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल या सगळ्याचा अभ्यास करण्यात आला होता. अखेर सीबीआय तपासाअंती या दोन्हीही स्वतंत्र घटना होत्या, हे समोर आलं आहे.