सुनील जाधव, डोंबिवली प्रतिनिधी : डोंबिवलीमध्ये (Dombivli Crime News) एका चाळीतील घरात गॅस सिलिंडरचा स्फोट (Gas Cylinder Blast) झाला. या स्फोटामध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती जखमी झाली. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली होती. पहाटेच्या वेळी ही घटना घडल्यानं आजूबाजूला साखर झोपेत असणाऱ्यांना स्फोटाच्या आवाजाने मोठा धक्का बसला. तर संपूर्ण परिसर गॅस सिलिंडरच्या स्फोटाने हादरुन गेला. डोंबिवली पश्चिमेकडील (Dombivli West) उमेश नगर देवीचा पाडा परिसरात राहणारे हनुमंत मोरे आज (17 जुलै) पहाटे 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास कामावर जाण्यासाठी उठले. पहाटेच्या वेळी दिवाबत्ती करताना त्यांनी काडेपेटी/लायटर पेटवलं होतं. त्यावेळी संपूर्ण गॅस लिक झाल्याची त्यांना क्लपनाही नव्हती. देवबत्तीसाठी पेटवलेल्या एका ठिणगीनं सिलिंडरचा स्फोट झाला आणि अख्खं घर पेटलं. स्वयंपाक घरात असलेल्या सिलिंडरच्या स्फोटातील आगीने घरासह हनुमंत मोरे यांनाही भक्ष्य बनवलं.
भीषण आगीत हनुमंत मोरे प्रचंड होरपळले. जवळपास 40% ते भाजले असून त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सिलेंडरच्या टाकीचा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटात घराचे पत्रे तुटून उडाले. तर स्वयंपाक घरातील बहुतांशी सामान जळाले. संपूर्ण परिसर या स्फोटाच्या आवाजाने पहाटे साडे तीन वाजता हादरुन गेला होता. नेमकं काय झालं, हे पाहण्यासाठी आजूबाजूच्या चाळीतील लोकंही घराबाहेर पडली होती.
दरम्यान या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून मोरे यांच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांचा मुलगा श्रीनिवास मोरे यांनी सांगितले. गॅस सिलेंडरच्या स्फोटात 65 वर्षीय हनुमंत मोरे गंभीररीत्या भाजले गेलेत. डोंबिवली पश्चिमेकडील उमेश नगर परिसरात घडलेल्या या घटनेनं एकच गोंधळ उडाला होता. सध्या जखमी हनुमंत मोरे यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घरातील गॅस आधीपासून गळती झाली होती. त्यामुळे ज्वलनशील वायू संपूर्ण घरात पसरलेला होता. मात्र याची पुसटीशीही कल्पना वयोवृद्ध हनुमंत मोरे यांना नव्हती. सकाळी नेहमीप्रमाणे पुजेच्या कामाला लागले असता त्यांनी दिवाबत्तीसाठी पेटवलेली ठिणगी सिलिंडरच्या स्फोटाला जबाबदारी ठरल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. मोरे हे एकटेच घरात राहत होते, अशीही माहिती समोर आली आहे.
या भीषण स्फोटानंतर लगेचच अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केलंय. दरम्यान, या भीषण स्फोटात आजूबाजूच्या घरांचंही किरकोळ नुकसान झालंय. तर मोरे यांच्या घराची मोठी आर्थिक हानी झाली आहे. यावेळी घटनास्थळी बचावकार्य केलेल्या लीडिंग फायरमन शिवाजी म्हात्रे, आणि राजेश कासवे यांनी या घटनेबाबत माहिती दिलीये.