डोंबिवली : पोलिसांच्या खुर्चीत बसून रिल्स बनवणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं. फक्त पोलिसांच्या खुर्चीत बसूनच नव्हे, तर चक्क हातात बंदूक घेऊन, भरपूर रोकड समोर ठेवूनही या महाशयांनी रिल्स बनवले होते. अखेर या रिल्सची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. महत्त्वाचं म्हणजे पोलीस स्थानकात (Dombivli Crime News) रिल्स बनवल्यामुळे या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सोशल मीडियावर (Social Media) रिल्स (Instagram Reels) बनवून शक्तिप्रदर्शन करणाऱ्या या व्यक्तिची ओळखही पटवण्यात आलीय.
सोशल मीडियावर रिल्सचा नाद अनेकांना लागलाय. हाच नाद डोंबिवली जवळील ठाकुर्ली परिसरात राहणाऱ्या सुरेंद्र पाटील या व्यक्तीलाही लागला. एकापेक्षा एक रिल्स बनवण्यासाठी सुरेंद्र पाटील यांनी बंदूकही हातात घेतली.
इतकंच काय तर एका रिलमध्ये त्यांनी टेबरभर रोकड ठेवली आणि व्हिडीओ शूट केला. हे रिल्स त्यांना अपेक्षा असल्याप्रमाणे चर्चेत तर आलेच. पण आता याच रिल्समुळे त्यांच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे.
बंदूक घेऊन रिल्स करणं, कॅश ठेवून व्हिडीओ बनवणं आणि पोलिसांच्या खुर्चीत बसणं सुरेंद्र पाटील यांना भोवलंय. त्यांच्याविरोधात मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता त्यांना कोर्टासमोरही हजर करण्यात येणार आहे.
डोंबिवली आणि परिसरात सुरेंद्र पाटील यांचे रिल्स व्हायरल झाले होते. त्यांच्या रिल्सची तुफान चर्चा रगंली होती. पण चक्क पोलीस स्टेशन आणि बंदुकीसह बनवलेल्या रिल्समुळे ते पोलिसांच्या निशाण्यावर आलेत.
याआधी पुणे आणि पिंपरी पोलिसांनीही अनेकदा रिल्स बनवणाऱ्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर रिल्स बनवताना शस्त्र दाखवणाऱ्यांना कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. आता पुन्हा एकदा तशीच कारवाई डोंबिवलीत करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय.
सुरेंद्र पाटील यांचे इन्स्टाग्रामवर 91.7 हजार फॉलोअर्स आहेत. आतापर्यंत त्यांना 730 पेक्षा जास्त पोस्ट केल्या आहेत. सुरेंद्र पाटील हे स्वतःला इन्स्टाग्रामवर डोंबिवली किंस असल्याचं सांगतात. सोशल मीडियावर रिल्स बनवणाऱ्यांना या कारवाईतून आता धडा मिळतो, का हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.