सुनिल जाधव, TV9 मराठी, डोंबिवली : डोंबिवलीत कोंटुबिक वादातून एकाने आपल्या दोन मुलांसह पत्नीचाही जीव (Dombivli Murder News) घेतलाय. हे हत्याकांड थरकाप उडवणारं होतं. आपल्या पत्नीसह दोन मुलींनाही झोपेतच एका माथेफिरुने जिवंत जाळलं आणि त्यांची हत्या (Burn alive and killed wife and two daughters) केली. त्यानंतर घरात आग लागल्याच्या बनावदेखील करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. डोंबिवलीच्या (Dombivli Crime News) भोपर परिसरात 1 ऑक्टोबर रोजी पहाटे ही खळबळजनक घटना घडली.
प्रसाद पाटील हा व्यक्ती पत्नी आणि दोन मुलींसह डोंबिवलीच्या भोपर इथं राहत होता. त्याच्या पत्नीचं नाव प्रिती होतं. तर दोन लहान मुली समीरा आणि समिक्षाही सोबतच राहत होत्या. प्रसादचे पत्नी प्रितीसोबत सारखे वाद व्हायचे. हा वाद संपवण्यासाठीच प्रसादने टोकाचं पाऊल उचललं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसादने पत्नीसोबतचा वाद कायमचा संपवण्यासाठी धक्कादायक कृत्य केलं. प्रिती ही समिरी आणि समिक्षा या आपल्या दोन मुलींसह घरात रात्री झोपली होती. त्यावेळी प्रसादने त्या तिघांच्या अंगावर रॉकेल ओतलं आणि त्यांना जिवंत पेटवून दिलं.
यावेळी लागलेल्या आगीत प्रसादही भाजला गेला. पण जिवंत जळालेल्या प्रितीसह समिरा आणि समिक्षाही गंभीररीत्या आगीत होरपळल्या. प्रचंड भाजल्या गेल्या. अख्खं घर पेटल्याचं पाहून शेजारीपाजारीही मदतीसाठी धावले. लोकांना वाटलं की घराला कोणत्यातरी कारणामुळे आग लागली असावी.
प्रसाद यांनीच आरडाओरडा करुन शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावलं. नंतर प्रसादसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला स्थानिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलं. चारही जणांवर रुग्णालयात उपचार सुरु होते.
या प्रकरणाची माहिती पोलिसांना कळल्यानंतर मानपाडा पोलिसांनी तपास सुरु केला. संशयास्पद घटनेमुळे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. चौकशीअंत धक्कादायक माहिती उघडकीस आलीय. घराला आग लागण्याच्या चार दिवस आधीच प्रसादने प्रितीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक खुलासा चौकशीतून समोर आला. डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस स्थानकातील एसीपी सुनील कुराडे यांनी याबाबतीची माहिती दिली.
चार दिवस आधीच प्रसादने पत्नी प्रितीला गळफास लावून मारण्याचा प्रयत्न केला होता. पण घरातल्यांनी त्यांच्या वादावर अखेर तोडगा काढला होता. यानंतर प्रितीच्या घरातल्यांनी तिला माहेरी येण्यास सांगितलं होतं. प्रसादने मात्र प्रितीला नवरात्रीनंतर माहेरी जाण्यास सांगितलं. पण प्रसादने नवरात्रोत्सवाच्या आधीच पत्नीसह मुलांनाही संपवण्यासाठी त्यांना जिवंतच जाळण्याचा कट आखला होता.
गंभीररीत्या भाजल्यानं प्रिती आणि तिच्या दोन्ही मुलींची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. तिघींचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. अखेर याप्रकरणी पोलिसांनी प्रसाद विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलाय.
प्रसादवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याला लवकरच आता पोलीस अटकही करणार असून उपचारानंतर प्रसादला कोर्टात हजर केलं जाईल. त्यानंतर पुढील कारवाई मानपाडा पोलिसांकडून करण्यात येणार आहे.
प्रीतीच्या माहेरचे जेव्हा तिच्या घरी प्रसादसोबत चर्चा करण्यासाठी गेले होते, तेव्हा दोघी मुलींनी कळकळीची विनंती केली होती. ‘आम्हाला लवकरात लवकर येथून घेवून चला नाहीतर पप्पा आम्हाला जीवे ठार मारतील’ असे प्रीतीसह तिच्या दोन्ही मुलींनी सांगितले होते. तेव्हाच जर चिमुकल्यांचे हे बोल ऐकले असते, तर कदाचित आज या तिघीही जिवंत असत्या. या धक्कादायक घटनेनंतर हडळकृत्य केलेल्या प्रसादविरोधात एकच संताप व्यक्त केला जातोय.