नालासोपारा : शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक प्रमोद दळवी (Pramod Dalvi) यांची ईडीकडून (ED) चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ई़डीने दळवी यांची 25 जूनपासून आतापर्यंत चार ते पाचवेळा ईडी कार्यालयात बोलावून चौकशी केली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील (PMC Bank Scam) मुख्य आरोपी एचडीआयएलचे (HDIL) मालक राकेश वाधवान (Rakesh Wadhawan) यांच्या आर्थिक व्यावहारासंबंधी ही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. प्रमोद दळवी यांच्या चौकशीतून वसई-विरारमधील बांधकाम व्यवसायिकांसह मुंबईतील शिवसेनेचे बडे नेते ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रमोद दळवी हे शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक आहेत. ते वसई विरारसह मुंबईतील बांधकाम आणि हॉटेल व्यवसायिक आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार तथा एन्काऊंटर स्पेशालिस्ट, माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या प्रचाराची धुराही प्रमोद दळवी यांनी सांभाळली आहे
2016 मध्ये नोटबंदी काळात तत्कालीन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक धनंजय गावडे यांना 1 कोटी 15 लाखांच्या नव्या नोटांसह इन्कमटॅक्स आणि लोकल क्राईम ब्रँचने पकडले होते. त्या नव्या नोटा प्रमोद दळवी यांच्या घरातून गावडे यांनी घेतल्याचे तपासातून समोर आले होते. याच घटनेत गावडे आणि प्रमोद दळवी यांच्या घरांची दोन दिवस तपासणी देखील झाली होती.
ईडीची मुंबईत धडाकेबाज कारवाई सुरुच आहे. ईडीने काल (16 जुलै) आयसीआयसीआय बँक लोन घोटाळ्याप्रकरणी व्हिडीओकॉन कंपनीचे मालक उद्योगपती धूत बंधूंशी संबंधित काही जागांवर छापा टाकला होता. दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणातही ईडीची वेगाने कारवाई सुरु आहे. ईडीने देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त केली आहे. याशिवाय देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनी ईडीला हवे असलेले कागदपत्रे ईडी कार्यालयात जमा केले आहेत. याप्रकरणात ईडीने देशमुखांच्या दोन सचिवांना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
संबंधित बातम्या :
अनिल देशमुखांच्या पत्नी चौकशीला हजर राहिल्या नाही, पण वकिलामार्फत ईडी कार्यालयात कागदपत्रे सादर
सचिन वाझेने नाव फोडलेले ‘नंबर वन’ साहेब अनिल देशमुख नव्हे, वकिलाचा दावा, दुसरंच नाव सांगितलं!
अनिल देशमुखांच्या खासगी सहाय्यकांचा ईडी मुक्काम वाढला, 20 जुलैपर्यंत कोठडीत वाढ