मुंबई : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून कारवाईचा सपाटा सुरुच आहे. ईडीने आज मुंबईतील शिवालीक ग्रुपच्या मालकीची 81 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये 101 जमिनीचे तुकडे आणि एका हेलिकॉप्टरचा समावेश आहे. खरंतर काही दिवसांपूर्वी युनिटेक कंपनीच्या विरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणाचा तपास सध्या ईडीकडून सुरु आहे (ED seized Shivalik Group Property worth Rs 81 crore on Unitech group case).
ईडीकडून युनिटेक कंपनीच्या अनियमितपणे व्यवहाराचा तपास सुरु आहे. युनिटेक कंपनीने शिवालीक ग्रुपसह वेगवेगळ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात म्हणजेच 574 कोटी रुपये दिले होते. मात्र, ते पैसे का दिले? इतकी मालमत्ता कुठून आणली? या संबंधित अनेक प्रश्नांचा खुलासा होत नव्हता. दरम्यान, युनिटेकने दिलेल्या पैशांमधून शिवालीक ग्रुपने जमीन आणि हेलिकॉप्टर विकत घेतल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना तपासातून मिळाली. अखेर ईडीने याप्रकरणी कारवाई करत शिवालीक ग्रुपची 81 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे (ED seized Shivalik Group Property worth Rs 81 crore on Unitech group case).
युनिटेक कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीकडून तपास सुरु आहे. या प्रकरणी तपास करत असताना कंपनीने अनेक व्यवहार अनियमीत केल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी 4 मार्च रोजी देशात आणि मुंबईत मिळून सुमारे 35 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. या चौकशीत युनिटेक कंपनीने शिवालीक, ट्रिकर ग्रुप आणि इतर काही कंपन्यांमध्ये पैसे फिरवल्याच उघडकीस आलं होतं. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेकांच्या चौकशा केल्या.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी ट्रिकर ग्रुपची 350 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यानंतर आज शिवालीक ग्रुपची 81 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी युनिटेक प्रकरणात आता पर्यंत 431 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
युनिटेक ही एक रियल इस्टेट कंपनी आहे. ही कंपनी एकेकाळी देशातील सर्वात मोठी रियल इस्टेट कंपनी होती. रमेश चंद्रा यांनी 1971 साली या कंपनीची स्थापना केली होती. रमेश चंद्रा यांनी मातीच्या चाचणीचा व्यवसाय सुरु केला होता. सुरुवातीला त्यांनी या कंपनीचं नाव युनिटेक टेक्निकल कन्सल्टन्ट असं नाव दिलं होतं. पण 1985 साली त्यांनी हे नाव बदलून युनिटेक असं ठेवलं होतं. त्यानंतर 1986 साली ही कंपनी रियल इस्टेटच्या व्यवसायात उतरली.
रमेश चंद्रा यांचे चिरंजीव संजय चंद्रा आणि अजय चंद्रा हे 1986 पासून या कंपनीचं कामकाज पाहू लागले. 2000 ते 2007 हा कालावधी रियल इस्टेट व्यवसायासाठी चांगला होता. या कालावधीत कंपनीने अनेक मोठमोठे रियल इस्टेट प्रोजेक्ट पूर्ण केले. यामध्ये अनेक मॉलचा समावेश आहे.
व्यवसायातील वाढता नफा, रियल इस्टेट कंपनीतील घवघवीत यश, त्याचबरोबर केंद्र सरकारने कंपनीत फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंटसाठी परवानगी दिल्याने युनिटेकचे शेअर्सची किंमत वेगाने वाढत होती. जानेवारी 2008 पर्यंत युनिटेकची मार्केट कॅपिटायलेझन 8500 कोटींच्या पुढे गेली. त्यामुळे ही कंपनी देशातील सर्वात मोठी रियल इस्टेट कंपनी म्हणून नावारुपाला आली.
व्यवसायात मिळणाऱ्या यशानंतर संजय चंद्रा यांनी 14 हजार एकर जमीन विकत घेतली. रियल इस्टेट कंपनी असल्याने त्यांना जमीन खरेदीसाठी काही मर्यादा येत होत्या. त्यामुळे त्यांनी युनिटेकच्या वेगवेगळ्या 350 कंपन्या सुरु केल्या. त्यामाध्यमातून त्यांनी जमीनी खरेदी केल्या. यानंतर युनिटेकने अनेक रिसेडेन्शिअल प्रोजेक्ट सुरु केले. त्यामध्ये अनेकांनी बुकिंग केली. पण नंतर 2008 मध्ये मोठी आर्थिक मंदी आली. त्याचा मोठा फटका कंपनीला झाला. त्यामुळे युनिटेक कंपनी अनेक प्रोजेक्ट वास्तवात उभे करुच शकली नाही.
युनिटेक कंपनी विविध शहरांमध्ये प्रोजेक्ट उभं करताना संबंधित शहरातील बांधकाम कंपनीला बरोबर घेत असे. त्यामध्ये शिवालीक ग्रुपचाही समावेश होता. या कंपनीच्या मदतीने युनिटेक मुंबईत टाऊनशिप आणि निवासी संकुल उभारणार होती. पण ते उभे राहिलेच नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंचा परदेशात काळा पैसा, ईडीला पुरावे देणार, आमदार रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप