नवी मुंबई : चोर कधी काय चोरी करेल याचा नेम नाही. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील वाईन शॉप फोडून दारुच्या बाटल्या आणि रोख रक्कम चोरणाऱ्या गुन्हेगाराला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, हा चोर वाईन शॉपमधून फक्त विदेशी दारुच्या बाटल्याच चोरी करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेले एक वाईन शॉप 11 ऑगस्टला लुटल्याची घटना घडली होती.
वाॅईनशॉपचे शटर ब्रेक करुन वाईन शॉपमधील महागडी दारु चोरी झाल्याबाबत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना घटनास्थळावरील मिळालेले सीसीटीव्ही फुटेज, आरोपी इसमाची गुन्हा करण्याची पद्धत, तसेच नवी मुंबई आयुक्तालयामध्ये अशाच प्रकारचे यापूर्वी दाखल झालेले गुन्हे याचा तांत्रिक तपास करण्यात आला.
या सर्व गुन्ह्यातील मोडस ऑपरेंडी सारखीच होती. यावरुन नवी मुंबईतील सर्व गुन्हे एकाच आरोपीने केल्याचं एनआरआय पोलिसांच्या लक्षात आलं. गेले वर्षभर नवी मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यातील पोलीस या सराईत गुन्हेगाराचा शोध घेत होते. एनआरआय पोलिसांनी या चोरट्याला पकडण्यासाठी 3 टीम तयार केल्या.
पोलिसांच्या या 3 टीम तपास करत असताना कल्याण येथील खडेवडवली गावात राहणाऱ्या रामनिवास मंजू गुप्ता याला ताब्यात घेतलं. रामनिवास याची कसून चौकशी केली असता रामनिवास याने गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्या व्यतिरिक्त आरोपीने नवी मुंबईत केलेल्या इतर 6 गुन्ह्यांची देखील कबुली दिली. सदर आरोपीवर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात एकूण 21 गुन्हे दाखल असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली.
नवी मुंबईतील वाशी, सानपाडा, तळोजा, नेरुळ आणि एनआरआय पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हे दाखल आहेत. तर ठाण्यामध्ये उल्हासनगर, कल्याण, मानपाडा, कोळसेवाडी आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ठाणे, नवी मुंबई सोबत मुंबईतही अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. नवी मुंबई पोलिसांनी आरोपी रामनिवास मंजू गुप्ता याच्याकडून एकूण सव्वा 3 लाख रुपयांची विदेशी दारु जप्त केली.
ज्यात नामांकित 17 विदेशी कंपन्यांच्या महागड्या दारु आहेत. एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे पृथ्वीराज घोरपडे यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सह पोलीस निरिक्षक समीर चासकर, पोलीस हवालदार जगदीश पाटील, शरद वाघ, दीपक सावंत, पोलीस नाईक विजय देवरे, किशोर फंड, पोलीस शिपाई प्रशांत वाघ, अजित देवकाते, उत्तेश्वर जाधव यांनी ही उत्तम कामगिरी केलेली आहे.
Mumbai Sakinaka Rape : मुंबईला पुन्हा हादरवणाऱ्या साकीनाका बलात्कार प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं?https://t.co/GF62NGfYsg
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 11, 2021
संबंधित बातम्या :
माणसापेक्षा माकडांना हत्या, आत्महत्या जास्त कळते? त्या विहिरीत नेमकं काय होतं?
पुण्यात दोन वर्षांच्या चिमुरड्यासह आईने विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं