मुंबई : मुंबई शहर हे ड्रग्स माफियांचं एक प्रमुख केंद्र आहे. येथून त्यांचा ड्रग्ज व्यवसाय सुरळीत चालत होता. पण काही महिन्यांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेल या दोन संस्थांची ड्रग्स माफिया आणि पेडलर्सच्या विरोधात सतत कारवाई सुरु आहे. परिणामी ड्रग्स व्यावसायातील लोकांमध्ये अफरातफर सुरु झाली आहे. यामध्ये आता सर्वात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. मुंबई आणि जवळपासच्या भागात सध्या सुरू असलेल्या ड्रग्स व्यवसायात मोठ्या प्रमाणावर परदेशी नागरिक सक्रिय आहेत. यामध्ये नायजेरियन ड्रग्स पेडलर्सचा जास्त समावेश आहे. हे परदेशी ड्रग्स विक्रेते तपास करण्याऱ्या यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत .
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे जोनल डायरेक्टर समीर वानखेडे आल्यापासून मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात ड्रग्स व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू आहे. दक्षिण मुंबईमध्ये ड्रग्सचे अनेक कारखाने उद्धवस्त करण्यात आले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबत लिंक असलेल्या चिंकू पठाण, अरिफ भुजवाळा, सोनू पठाण सारखे अनेक मोठे ड्रग्स माफियांच्या मुसक्या आवळ्या गेल्या आहेत. त्याचबरोबर मोठ्या संख्येत छोटे-मोठे ड्रग्स पेडलर्स हे तुरुंगात पोहोचले आहेत. पण या दरम्यान अनेक परदेशी आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. हे परदेशी आरोपी संगठीत असून आपापल्या परिसरामध्ये ड्रग्स व्यवसायात सक्रिय होऊन भारतीय ड्रग्स व्यवसायिकांच्या अटकेनंतर मोकळ्या जागा भरण्याचा प्रयत्न करत आहेत.
एकूण 29 परदेशी ड्रग्स पेडलर्स अटकेत
एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्स अँगल आल्यानंतर एनसीबीने मोठ्या प्रमाणावर ड्रग्स विक्री करणाऱ्या परदेशी नागरिकांवर कारवाई करून अटक केली आहे. मागील काही महिन्यात एनसीबीने ड्रग्स व्यवसायात गुंतलेल्या जवळपास 19 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यात सर्वात जास्त 15 आरोपी हे नयजीरियन आणि 4 इतर देशातले आहेत. ते अत्यंत संगठीत असून प्रत्येक भागात एकमेकाला त्रास न देता ड्रग्स व्यवसाय करत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
वसईतून काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या नयजीरियन आरोपी चुकवा एमेका योगबोमाच्या अटकेनंतर तपासात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. नयजेरियामध्ये कॉल सेंटर होतं. तिथे ड्रग्ससाठी आर्डर दिलं जात होतं. नंतर मुंबईच्या आजूबाजूला असणाऱ्या परदेशी ड्रग्स पेडलर्स इथे पाहिजे तिथे ड्रग्स पोहोचवित होते. एनसीबीने जवळपास 30 कोटींचे ड्रग्स या परदेशी नागरिकांकडून मागील काही महिन्यात जप्त केलं आहे.
मुंबई पोलिसांची ड्रग्स विरोधात काम करणारी अँटी नार्कोटिक्स सेल म्हणजे अंमली पदार्थ विरोधीपथकाने ड्रग्स माफिया विरोधात मोहीमच सुरू ठेवली आहे. अँटी नार्कोटिक्स सेलमार्फत या वर्षाच्या सुरुवाती पसून आतापर्यंत एकूण 10 परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 6 कोटी 38 लाख किंमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. यामध्ये 1335 ग्रॅम एमडी ड्रग्स आणि 1614 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे परदेशी नागरीक सुरुवातीला काहीतरी कारण देऊन जसं की नोकरी, उपचारचा आधार घेऊन मुंबईत येतात. नंतर ते इथेच स्थायीक होऊन ड्रग्स व्यवसायात गुंततात. या सर्वांनी आपापला एरिया देखील वाटून घेतला आहे. ते दुसऱ्याच्या एरियामध्ये हस्तक्षेप शक्य तो करीत नाही.
नायजेरियन आरोपी तर एवढे हिंसक होतात कि अनेक वेळा तपासादरम्यान त्यांनी तपास करणाऱ्या पोलिसांवर हल्ला किंवा फायरिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याजवळ कोणतेही कागदपत्रे मिळत नाहीत किंवा कोणताच पुरावा मिळत नाही. त्यामुळे त्यांची ओळख पटवून ते ज्या देशातून आले आहेत त्या देशात पाठविणे हे आपल्या तपास यंत्रणेसमोर एक मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.
हेही वाचा :
ज्या पेगाससवर संसदेत रान उठलंय, ते नेमकं आहे काय, नेमकी हेरगिरी कशी केली जाते? वाचा सविस्तर
एकाने फिट आल्याचं नाटक केलं, गंभीर गुन्ह्यातील चौघे आरोपी माढा सबजेलमधून पळाले