मुंबई : मुंबईतील पायधुनी परिसरात भररस्त्यात झालेल्या सोने चोरी (Theft) प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी राजस्थानच्या जालोरमधून अटक (Arrest) केली आहे. आरोपींकडून 95 टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींनी 23 जुलै रोजी एका सोने व्यापाऱ्याच्या नोकराकडील 890 ग्रॅम वजनाचे 44 लाख 50 हजार रुपये किंमतीचे सोने (Gold) हिसकावून पळ काढला होता. गणेश असे लुटण्यात आलेल्या नोकराचे नाव आहे. याप्रकरणी सदर व्यापाऱ्याकडून पायधुनी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. फिर्यादीनुसार 24 जुलै रोजी कलम 392, 34 अन्वये गुन्हा नोंद करत तपास सुरु करण्यात आला. पोलिसांनी 48 तासाच्या आत राजस्थानमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
गणेश हा 23 जुलै रोजी रात्री साडे आठच्या सुमारास 890 ग्रॅम वजनाचे सोने घेऊन पायधुनी परिसरातील धोबी स्ट्रिट परिसरातून पायी जात होता. यावेळी तेथे दबा धरुन बसलेल्या चार आरोपींनी त्याच्याकडील सोने हिसकावून घेत पळ काढला. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी गुन्हा दाखल करत परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपास आणि चौकशीअंती हे चौघे आरोपी राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील राणीवाडा येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे एक पथक तात्काळ राजस्थान येथे रवाना होत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून चोरी केलेला 502 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 328 ग्रॅम सोन्याचे बिस्किटे असा एकूण 830 ग्रॅम वजनाचा 95 टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर आरोपींना जालोर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 28 जुलैपर्यंत ट्रान्झिट रिमांड मंजुर केला होता. यानंतर आरोपींना मुंबईतील शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले. शिवडी न्यायालयाने चौघाही आरोपींना 1 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पुढील तपास पायधुनी पोलीस करत आहेत. (Four accused arrested from Rajasthan in case of gold theft from Pyadhuni in Mumbai)