सावधान! व्हीआयपी मोबाईल नंबर मिळवून देण्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा; मुंबईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश

| Updated on: Aug 02, 2021 | 9:17 PM

सायबर सेल पोलिस ठाण्याच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी पद्धतशीरपणे सापळा रचून आरोपींना अटक केली. आरोपींकडून वेगवेगळ्या बँकांची 10 एटीएम कार्ड, 6 मोबाईल व विविध कंपनीचे 8 सिमकार्ड्स तसेच एक गावठी कट्टा व 9 जिवंत काडतूसेही सापडली आहेत.

सावधान! व्हीआयपी मोबाईल नंबर मिळवून देण्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा; मुंबईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश
सावधान! व्हीआयपी मोबाईल नंबर मिळवून देण्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा
Follow us on

मुंबई : गाड्यांच्या व्हीआयपी नंबरप्लेटप्रमाणेच आपल्या मोबाईलचा नंबरही व्हीआयपी असावा, अशी इच्छा बाळगणारे अनेक मोबाईलप्रेमी आहेत. या मोबाईलप्रेमींची भारी हौस हेरून त्यांना व्हीआयपी नंबर मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा मुंबई सायबर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या टोळीने देशभरात अनेक नागरिकांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. आरोपी संतोष गुप्ता, प्रशित नार्वेकर, झेन अहमद खान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. (Fraud in the name of obtaining a VIP mobile number; Criminal gang busted in Mumbai)

एअरटेल कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून फसवणूक

आपला मोबाईल नंबर कुणाच्या लक्षात राहणारा असावा, यासाठी वाट्टेल ते पैसे मोजणारे अनेक हौशी लोक आहेत. त्यांच्या मानसिकतेचा गैरफायदा आरोपी संतोष गुप्ता, प्रशित नार्वेकर, झेन अहमद खान या तिघांनी घेतला. आरोपींनी व्हॉटसअप मेसेज आणि ई-मेलद्वारे संपर्क करून आपण स्वत: एअरटेल कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून मोबाईलधारकांचा विश्वास संपादन केला. याचदरम्यान एअरटेल कंपनीचा लोगो, ई-मेल आयडी, जीएसटी क्रमांक, पत्ता वापरून लोकांना जाळ्यात खेचले. आरोपींनी फिर्यादींना भारती एअरटेलच्या IDFC FIRST BANK या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी सांगितले. या माध्यमातून टप्याटप्याने एकूण 3 लाख 33 हजार 019 रुपये जमा करून घेतले. पण अनेक दिवस झाले तरी देखील व्हीआयपी मोबाईल नंबर मिळत नसल्याने तक्रारदाराने पैसे परत मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. मात्र तक्रारदाराचा आरोपींशी संपर्कच होऊ शकला नाही. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.

सापळा रचून आरोपींना केली अटक

सायबर सेल पोलिस ठाण्याच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी पद्धतशीरपणे सापळा रचून आरोपींना अटक केली. आरोपींकडून वेगवेगळ्या बँकांची 10 एटीएम कार्ड, 6 मोबाईल व विविध कंपनीचे 8 सिमकार्ड्स तसेच एक गावठी कट्टा व 9 जिवंत काडतूसेही सापडली आहेत. आरोपींनी काही नामांकित कंपन्यांकडून 3500 ते 4500 रुपयांना एक लाख डाटा विकत घेतला. तसेच Go daddy या कंपनीकडून एअरटेल नावाचा डोमेन विकत घेतला असल्याचे प्राथमिक तपासादरम्यान उघडकीस आले आहे. लोकांना विविध मोबाईल कंपन्यांच्या व्हीआयपी नंबरचे आमिष दाखवून आणि खोटे बिल बनवून जवळपास 16 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. (Fraud in the name of obtaining a VIP mobile number; Criminal gang busted in Mumbai)

इतर बातम्या

मराठा विद्यार्थ्यांसाठी 14 ठिकाणी वसतीगृहे तयार; पालकमंत्र्यांच्या हस्ते लवकरच उद्घाटन होणार

नंदुरबारमध्ये राज्यातील सर्वात कमी पावसाची नोंद, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना ‘हा’ सल्ला