मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआय मुंबईच्या व्हिजिलेन्स टीम तर्फे मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत डीआरआयकडून जवळपास 35 कोटींचे हेरॉईन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस संपूर्ण रॅकेटबाबत तपास करत आहेत.
नाम्बियाहून मुंबईत ड्रग्जची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती डीआरआयच्या सूत्रांना मिळाली होती. त्यानुसार डीआरआय विजिलेन्स टीमने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा लावला होता. यावेळी नाम्बियाहून आलेल्या एका प्रवाशाच्या हालचाली संशयित जाणवल्या.
डीआरआयच्या टीमने या संशयित प्रवाशाला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्याकडे सफेद रंगाचे ड्रग्ज सापडले. एकूण 4.98 किलो हेरॉईन ड्रग्ज या प्रवाशाकडून जप्त करण्यात आले. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 35 कोटी रुपये आहे.
सदर ड्रग एका ट्रॉली बॅगेत काळ्या रंगाच्या प्लास्टिकमध्ये कॅव्हिटीत लपविण्यात आलं होतं. जे तपासाअंती पोलिसांनी जप्त करून आरोपीला अटक केली आहे.
मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी गोरेगावच्या संतोष नगर परिसरातूनही एका ड्रग्ज विक्रेत्याला अटक केली आहे. त्याच्याकडून एक कोटी रुपयांचे हेरॉईन (ड्रग्ज) जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा आरोपी मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये ड्रग्ज पुरवण्याचे काम करत होता.
जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचे वजन 270 ग्रॅम असून, त्याची किंमत 1 कोटी 8 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे ड्रग् तोज कोठे आणि कोणाला देणार होता याचा तपास सुरू आहे.