मुंबई : मुंबई परिसरातील साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेटीएमसारख्या बनावट अॅपच्या माध्यमातून एका हॉटेल मालकाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पेटीएम अॅपसारखे दिसणारे Spoof Payatm app या अॅपमधून हॉटेलचे तब्बल 50 हजार रुपयांचे बील देऊन पळ काढण्याचा प्रयत्न एका टोळीने केलाय. मात्र हॉटेल मालकाच्या तक्रारीनंतर अवघ्या काही तासांत साकीनाका पोलिसांनी तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील एका हॉटेलमध्ये तीन लोक भाड्याने राहण्यासाठी आले होते. या तीन लोकांनी अलिशान अशा तीन खोल्या बुक केल्या होत्या. या दिवसांत रुमचे एकूण 50 हजार रुपये भाडे झाले. नंतर हॉटेलमधून निघताना त्यांनी हॉटेल मॅनेजरला Spoof Payatm app अॅपमधून 50 हजार रुपये देऊ केले. तसेच या टोळीने येथून पळ काढला.
मात्र, जेव्हा हॉटेल मालकाने याबाबत बँकेत चौकशी केली. तसेच मालकाने यूट्यूबवर Spoof Payatm app या अॅपबद्दलची माहिती पाहिली. त्यानंतर मात्र आपली फसवणूक झाल्याचे हॉटेल मालकाच्या लक्षात आले. त्यानंतर हॉटेल मालकाने थेट साकीनाका पोलीस ठाणे गाठले. तसेच घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली.
दाखल तक्रारीनुसार साकीनाका पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल लोकेशन ट्रेस करून अवघ्या दोन तासांमध्ये या तिघा आरोपींना बेड्या ठोकल्या. मोहम्मद खलील उर्फ अनस अब्दुल कलाम शेख वय 23 वर्षे, इब्राहीम समसुद्दिन काजी वय 27 वर्षे, आयुष सुहास जगदाळे असे या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी मूळचे उत्तर प्रदेशमधील राहणारे आहेत.
दरम्यान, या आरोपींनी Spoof Payatm app या फेक अॅपच्या मदतीने मुंबईत अजून कुठे- कुठे फसवणूक केली आहे, याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. तसेच या टोळीमध्ये आणखी कोणी साथीदार आहेत का ? हेदेखील पाहिले जात आहे.
इतर बातम्या :