मुंबई : संपूर्ण देशभर गाजलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणात धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या हायप्रोफाईल हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने शीना जिवंतच असून, तिला दोन वकिलांनी गुवाहाटी विमानतळावर फिरताना पाहिले, असे म्हटले आहे. इंद्राणीने यासंदर्भात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयामध्ये अर्ज देऊन माहिती दिली आहे. गुवाहाटी विमानतळ परिसरात फिरणारी ती तरुणी शीना बोरा हीच आहे हे सिद्ध करण्यासाठी विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात यावे, याबाबत न्यायालयाने सीबीआयला आदेश द्यावेत, अशी विनंती इंद्राणीने केली आहे. तिच्या या दाव्यामुळे हत्याकांडाच्या खटल्याला नवीन कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
शीना बोरा हत्याकांडाचा खटला सध्या विशेष सीबीआय न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी साक्षीदार राहुल मुखर्जीची उलट तपासणी घेण्यात आली. इंद्राणीचे वकील रणजीत सांगळे यांनी राहुलच्या दाव्यातील अनेक विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला.
त्यादरम्यान ही इंद्राणीच्या वकिलांनी शीना ही जिवंत असल्याचे पटवून देण्याच्या अनुषंगाने युक्तिवादही केला. या सर्व पार्श्वभूमीवर खटल्यात नवीन ट्विस्ट देणारा दावा इंद्राणीने केला आहे.
आयएन एक्स मीडियाची माजी वकील सविना बेदी यांनी शीना बोरा ही गुवाहाटी विमानतळावर दिसल्याचे म्हटले आहे. बेदी या इंद्राणी मुखर्जीच्या आधीच्या वकील आहेत. त्यांनी हा दावा करतानाच इंद्राणीच्या अर्जासोबत आपले प्रतिज्ञापत्र देखील जोडले आहे.
याचा विचार करत न्यायालयाने गुवाहाटी विमानतळाच्या आवारातील गुरुवारचे सीसीटीव्ही फुटेज मागून घ्यावे, अशी विनंती इंद्राणी मुखर्जीने अर्जातून केली आहे.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, इंद्राणी मुखर्जीने तिचा कारचालक शामवर राय आणि आधीचा पती संजीव खन्ना यांच्या मदतीने शीनाची गळा आवळून हत्या केली. एप्रिल 2012 मध्ये हे हत्याकांड करण्यात आले.
हत्येनंतर शीनाचा मृतदेह रायगडच्या जंगलात जाळण्यात आला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. 2015 मध्ये हे हत्याकांड उघडकीस आले होते. या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहे.