कल्याण : कल्याणमधून (Kalyan News) एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीवर चाकूने सपासप वार (Knife Attack) केले. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पत्नीच्या चारित्र्याव संशय घेत पतीने पत्नीवर जीवघेणा (Attempt to Murder) हल्ला केला. या हल्ल्यात गंभीरररीत्या जखमी झालेल्या पत्नीला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर पतीला पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. सध्या पोलिसांकडून हल्लेखोर पतीची चौकशी केली जाते आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेनं कल्याणमध्ये खळबळ माजली होती. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या स्कायवॉकवर एका महिलेवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर स्कायवॉकवर गोंधळ उडाला. नंतर पतीनेच आपल्या पत्नीला चाकूने भोसकल्याचं उघडकीस आलं. स्थानिक नागरिकांनी हल्लेखोर पतीला पोलिसांच्या हवाले केलंय. कल्याण पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
कल्याण जवळ आंबिवली येथे विकास पाटील आपल्या पत्नीसह राहतो . विकास त्याची पत्नी प्रविणाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. विकास व प्रवीणामध्ये नेहमीच भांडण होत होते. शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवॉक वरून दोघे पती पत्नी जात होते. या दरम्यान स्कायवॉकवर दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. या वादातून संतापलेल्या विकासने प्रविणावर चाकूने हल्ला करत मानेवर, गळ्यावर, छातीवर सपासप वार केले. या हल्ल्यात प्रविणाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी प्रवीनाला कल्याण मधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पत्नी प्रवीणावर वार करुन विकास पळून जाण्याच्या इराद्यात होता. पण त्याचा हा बेत स्थानिक सजग नागरिकांनी हाणून पाडला. विकासच्या हल्ल्यानंतर प्रवीण रक्तबंबाळ झाली होती. पण हल्लेखोर विकासला नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्या मुसक्या आवळल्यात. याप्रकरणी आता महात्मा फुले पोलीस पुढील तपास करत आहेत. तस जखमी प्रवीणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून प्रवीणा आणि विकास या दोघांच्याही कुटुंबीयांना या घटनेनं मोठा धक्का बसलाय.