मुंबई : माणूस यशस्वी झाला किंवा प्रसिद्धिच्या झोतात आला तर त्या व्यक्तीच्या प्रगतीवर नाराज होणारे किंवा निंदकही जन्माला येतात, असं बोलतात. तसंच काहिसं कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासोबत घडताना दिसतंय. काही दिवसांपूर्वी गणपत गायकवाड यांच्या मुलाची त्यांच्याच सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाने फसवणूक केल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर संबंधित तरुणाला अटकही करण्यात आली. हे प्रकरण मिटत नाही तोवर गणपत गायकवाड यांच्याशी संबंधित आणखी एक नवं प्रकरण उभं राहिलं आहे. ते म्हणजे एका व्हायरल व्हिडीओचं !
कल्याण-डोंबिवलीत सध्या एका व्हिडीओची प्रचंड चर्चा सुरु आहे. तो व्हिडीओ म्हणजे गणपत गायकवाड यांनी ईव्हीएम हॅक करुन मतदानात निवडून आल्याचा दावा करणारा व्हिडीओ. म्हणजे संबंधित व्हिडीओत एका तरुणाने तसा दावा केला आहे. तसेच त्या व्हिडीओत समोरचा जे काही बोलतोय ते त्याच्याकडून काढून घेऊन त्याचं स्टिंग ऑपरेशन सुरु असल्याचं दाखवण्यात आलं आहे. व्हिडीओत आजूबाजूची माणसं दिसत नाहीयत. फक्त एक इसम दिसतोय. तोच सर्व काही बोलतोय. त्याला व्हिडीओ शूट केलं जात असल्याची कल्पना नाही, असं दर्शवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत कितपत सत्यता आहे याची माहिती समोर आलेली नाही. याशिवाय ‘टीव्ही 9 मराठी’ देखील अशा काही व्हिडीओजची पुष्टी करत नाही.
दरम्यान, या व्हिडीओतला इसम हा जेलमध्ये शिक्षा भोगत असून त्याने चुकीची माहिती दिल्याचा दावा गणपत गायकवाड यांनी केला आहे. संबंधित व्हिडीओत बोलणाऱ्या व्यक्तीचं नाव आशिष चौधरी असं असल्याची माहिती गणपत गायकवाड यांनी दिली आहे. विशेष म्हणजे आशिष चौधरी हा तोच व्यक्ती आहे ज्याने आमदार गायकवाड यांच्या मुलाला लाखोचा गंडा घातला होता. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान व्हायरल व्हिडीओ प्रकरणी गणपत गायकवाड यांनी पोलिसात तक्रार केली आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यावर भाजप आमदार गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करुन ठोस कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी याबाबत अशीष चौधरी आणि व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी सध्या पोलिसांचा तपास सुरु आहे.
हेही वाचा :
भाजप आमदाराच्या मुलाला गंडवणारा आरोपी अखेर जेरबंद, वाचा नेमकं प्रकरण काय?
यवतमाळमध्ये कुख्यात ड्रग्स तस्कर महिलेसह 4 जणांना अटक; तब्बल 1 क्विंटल गांजा जप्त