कल्याण (ठाणे) : दिवसाढवळ्या रस्त्याने पायी जात असलेल्या नागरिकांना लुटणाऱ्या रिक्षा चालक लुटारुला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने अटक केली आहे. सुफियान बागवान असे या लूटारुचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 31 महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत. या आरोपीचा चोरीसाठी चांगलाच हात बसला होता. तो सर्वसामान्यांवर दादागिरी करुन त्यांच्या हातातून मोबाईल हिसकवायचा. विशेष म्हणजे त्याचा प्रताप कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर अनेकांकडून या प्रकरणावर चिंता व्यक्त करण्यात आली होती. आरोपी चोरटे भर दिवसा अशा प्रकारे हैदोस घालत असतील तर त्यांना खरंच पोलिसांचा धाक राहिलेला नाही, अशी चर्चा परिसरात सुरु होती. अखेर पोलिसांनी या सराईत चोराच्या मुसक्या आवळल्या.
गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत चोरी आणि लुटीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. डोंबिवलीत दोन घटना आणि कल्याणच्या कोळसेवाडीतील एका घटनेमुळे पोलीस एका रिक्षा चालकाच्या शोधात होते. कारण त्या रिक्षा चालकाने पायी जात असलेल्या एका नागरिकाला हटकले. त्याच्याकडून जबरीने दिवसाढवळ्या मोबाईल हिसकावून घेतला. ही घडना कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.
संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीच्या शोधात होते. डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांना या रिक्षा चालकास पडकण्यात यश आले आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अविनाश वनवे यांच्या पथकाने सुफियान बागवान या रिक्षा चालक चोरट्याला भिवंडीहून अटक केली आहे. सुफियान याने अनेक ठिकाणी नागरीकांचे मोबाईल लुटले आहेत.
सुफियान याला नशेची लत आहे. तो रिक्षा चालक आहे. त्याला रिक्षा चालवून जास्त पैसे मिळत नाही. त्यामुळे तो लुटीचा धंदा करीत होता. कल्याण डोंबिवलीतील तीन गुन्हे त्याच्याकडून उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून 31 महागडे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्याने ते कुठून चोरी केले आहेत याचा तपास सुरु असल्याची माहिती डोंबिवलीचे एसीपी जे. डी. मोरे यांनी दिली आहे. मात्र रिक्षावाल्याच्या वेषात लुटारुचे बिंग फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. या लुटीत त्याचे साथीदार कोण आहेत, त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.
घटनेचा व्हिडीओ बघा :
VIDEO : रिक्षा चालकाच्या वेशात लुटीचा धंदा, सीसीटीव्हीच्या सहाय्याने चोरटा जेरबंद, 31 महागडे मोबाईल हस्तगत#KalyanCrime #Crime #MobileThieves #MobileTheft pic.twitter.com/owsiWGQJ4t
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 8, 2021
दरम्यान, गेल्या महिन्यात नालासोपाऱ्यात एका मोबाईल चोराला काही नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला होता. नालासोपारा पूर्व स्टेशन मार्केट परिसरातील रात्री 8 च्या सुमारास ची ही घटना घडली होती. एक महिला भाजी खरेदी करत असताना या चोराने तिच्या बेगेतून मोबाईल काढण्याचा प्रयत्न करत असताना एका सुजाण नागरिकाचा या घटनेवर लक्ष जाताच त्याने चोरट्याला रंगेहात पकडून चोप दिला. चोरट्याला बेदम चोप देऊन, पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. हाकेच्या अंतरावर तुळीज पोलीस ठाणे असतानाही, चोरीच्याआ घटना घडत असल्याने नागरिकांत रोष व्यक्त निर्माण झाला होता. नालासोपाऱ्यामध्ये वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळं नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
हेही वाचा :
Aryan Khan Bail : कोर्टात वकिलांची खडाजंगी, न्यायाधीश म्हणाले, तुम्ही थांबा नाही तर, मी थांबेन!
12 दिवसांपूर्वी मैत्रिणीची आत्महत्या, आता अल्पवयीन मुलीचाही गळफास, पोलीस चॅटिंगमधून गूढ उकलणार