ठाणे, २ सप्टेंबर २०२३ : कल्याण पश्चिम शिवाजी चौकातील घटना. मुलगा वडिलांसोबत मोबाईलवर बोलत होता. एक बाईकस्वार आला. त्याने ८५ हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला. याप्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण झोन तीनचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी एक पथक स्थापन केले. आरोपीचा शोध सुरू केला. कल्याण महात्मा फुले पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, गुन्हे शाखेचे प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही तपासणी करण्यात आली.
तानाजी वाघ , पोलीस हवालदार जितेंद्र चौधरी, मनोहर चित्ते, किशोर सूर्यवंशी, पोलीस शिपाई रामेश्वर गामणे, दीपक थोरात, आनंदा कांगरे , सुजित टिकेकर यांनी गुप्त माहिती काढली. कल्याण मंदिर आंबिवली परिसरात सापळा रचला. या सापड्यात 20 वर्षीय हसन सय्यद नावाच्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. सय्यदची चौकशी करण्यात आली.
हसन सय्यद एक सराईत गुन्हेगार आहे. तो नेहमी ड्रग्जच्या नशेत तर्र असतो. तो आधी चांगल्या मोटरसायकली चोरी करायचा. त्यानंतर रस्त्यावर फोन वर बोलत उभ्या असलेल्या नागरिकांच्या गळ्यातील सोने ओढत असे. त्यानंतर हसन सय्यद मोबाईल धूम स्टाईलने चोरी करायचा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हसन सय्यद याच्यावर ठाणे, भिवंडी, नवी मुंबईसह इतर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. दहा ते बारा केसमध्ये हा फरार आहे. सध्या या आरोपीने अजून इतर किती ठिकाणी अशा प्रकारचे चोरी केली आहे का, याचा तपास कल्याण महात्मा फुले पोलीस करत आहे. हसन हा अट्टल चोर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे आता तो चांगलाच रडारवर आला आहे. याशिवाय आणखी कोणकोणते गुन्हे त्याने केले आहेत, याचा तपास करून त्याला जेल हवा खावी लागणार आहे.