कल्याण (ठाणे) : तिकीट कन्फर्म करुन देण्याच्या बहाण्याने चोरटा प्रवाशाला कल्याणहून कुर्ला रेल्वे स्टेशनला घेऊन गेला. त्यानंतर चोराने प्रवाशाला मारहाण केली. त्याने प्रवाशाजवळी सर्व पैसे आणि मोबाईल हिसकावला आणि तो पसार झाला. या चोरट्याला कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने 24 तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे चांद मोहम्मद खान या भामट्याने हा अशा प्रकारचा तिसरा गुन्हा केला आहे (Kalyan Railway crime branch police arrest thief who loot passenger).
मुख्तार शेख नावाची एक व्यक्ती मंगळवारी (29 जून) दुपारी कल्याण रेल्वे आरक्षण केंद्रावर आला. त्याला बंगालला जायचे होते. त्याच्याकडे तिकीट कन्फर्म नव्हते. तिकीट कन्फर्म नाही तर तो जाणार कसा? या विवंचनेत तो होता. त्यावेळी त्याच्यासमोर एक तरुण आला. त्याने त्याला विचारले, तुम्हाला गावी जायचे आहे का? मी तुमचे तिकीट कन्फर्म करुन देतो. तुम्ही माझ्यासोबत कुर्ल्याला चला. मुख्तारला वाटले हा तरुण आपलं तिकीट कन्फर्म करुन देईल. या आशेवर तो त्या तरुणासोबत लोकलने कुर्ला रेल्वे स्टेशनला गेला (Kalyan Railway crime branch police arrest thief who loot passenger).
कुर्ला रेल्वे स्टेशनला पोहचल्यावर तो तरुण मुख्तारला एका निजर्नस्थळी घेऊन गेला. त्याने चाकूचा धाक दाखवून मुख्तार याच्या जवळील रोकड आणि मोबाईल घेतला. यावेळी त्याने मुख्तारला मारहाणही केली. त्यानंतर तो पैसे आणि मोबाईल घेऊन पसार झाला. या दरम्यान दोघांमध्ये झटापटही झाली. या झटापटीत मुख्तार जखमी झाला. या घटनेनंतर मुख्तार हा कल्याणला आला. त्याने या संदर्भात कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या प्रकरणाचा तपास कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे अधिकारी अरशद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाला. कल्याण रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्हीत मुख्तार साोबत तो चोरटा स्पष्ट दिसत होता. सीसीटीव्हीत दिसणारा चोरटा याची ओळख चांद मोहम्मद खान या नावाने पटली. कारण चांद मोहम्मद याने अशा प्रकारचे दोन गुन्हे यापूर्वी केले होते. एका गुन्ह्याची शिक्षा भोगून तो नुकताच जेलमधून सुटला होता. त्यानंतर रेल्वे क्राईम ब्रांचने मुंबई येथील नवापाडा परिसरातून चांद मोहंमद याचा पत्ता शोधून त्याला अटक केली आहे.