मुंबई : मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीची धाड पडल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह (Aryan Khan) आठ तरुणांना अटक झाली आहे. मात्र या आरोपींच्या कुटुंबीयांकडून पोरांचे लाडकोड अजूनही सुरु असल्याचं दिसत आहे. आरोपींसाठी कुटुंबीय मॅकडॉनल्डचा बर्गर घेऊन गेल्याचं पाहायला मिळालं.
क्रुझवर अटक केलेल्या एका मुलाची आई एनसीबी ऑफिसबाहेर पोहोचली. काही मुलांच्या नातेवाईकांनी त्यांच्यासाठी जेवण आणि कपडे आणले आहेत. एका आरोपीचे नातेवाईक त्याच्यासाठी चक्क मॅकडॉनल्डचा बर्गर घेऊन आले, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं.
आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सतीजा, इस्मित सिंग चड्ढा, मोहक जैस्वाल, गोमीत चोप्रा आणि विक्रांत छोकर या 8 जणांना एनसीबीने अटक केली आहे.
कोर्टात काय घडलं?
मुंबई-गोवा क्रूझवर 2 ऑक्टोबरच्या रात्री NCB ने धाड टाकून पार्टीतील ड्रग्जचा भांडाफोड केला होता. आर्यन खान आणि अरबाज मर्चंटसह आठ जणांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी देण्यात आली आहे. मुंबईतील किला कोर्टात सर्व आरोपींना हजर करण्यात आलं होतं. यावेळी NCB कडून अतिरिक्त महाधिवक्ते अनिल सिंह यांनी आर्यनच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. तर आर्यन खानकडून वकील सतीश मानेशिंदे (Satish ManeShinde) यांनी युक्तिवाद केला होता.
आर्यन खान ढसाढसा रडला
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने चौकशी दरम्यान कोठडीत कबूल केले आहे की तो गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेत होता. त्याने केवळ भारतातच नाही तर दुबई, यूके आणि इतर अनेक देशांतही अंमली पदार्थांचे सेवन केले आहे. चौकशीत असे समोर आले आहे की अरबाज मर्चंट देखील आर्यनसोबत सतत ड्रग्ज घेत होता. चौकशीदरम्यान आर्यन सतत रडत असल्याचेही समोर आले आहे. एनसीबीने आर्यनला फोनवर शाहरुखशी बोलण्याचीही मुभा दिली होती. शाहरुख खान आणि गौरी खान यांना त्यांचा मुलगा ड्रग्स घेत असल्याची माहिती असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
भारताबाहेर यूके, दुबईतही ड्रग्सचे सेवन
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखच्या ‘मन्नत’ या बंगल्यातही सर्च ऑपरेशनसाठीही टीम तयार आहे. आर्यनच्या अटकेनंतर, कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग म्हणून, एनसीबीने आर्यनला त्याच्या लँडलाईन फोनवरुन शाहरुख खानशी सुमारे 2 मिनिटे बोलण्यास दिले. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान चौकशीदरम्यान सतत रडत होता. त्याने भारताबाहेर यूके, दुबई आणि इतर देशांमध्ये ड्रग्सचे सेवन केले आहे.
‘मन्नत’मध्येही सर्च ऑपरेशन
शाहरुख खान आपली पत्नी गौरी आणि मुलं आर्यन, सुहाना आणि अबराम यांच्यासोबत आपल्या सहा मजली मन्नत बंगल्यामध्ये राहतो. मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात समुद्रासमोरच प्राईम लोकेशनला हा बंगला आहे. काही महत्त्वाच्या दिवशी शाहरुखचे चाहते त्याच्या घराबाहेर त्याला शुभेच्छा देण्यासाठी जमा होतात. ईद, दिवाळी किंवा होळीसारख्या सणांच्या दिवशीही शाहरुख बाल्कनीमध्ये येऊन आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देतो. हे पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे. या बंगल्याची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार दोनशे कोटी रुपयांच्या घरात आहे.
संबंधित बातम्या
aryan khan drug case | आर्यन खानला दिलासा नाहीच, कोठडीत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढ
जो अख्खं जहाज खरेदी करु शकतो, त्याला ड्रग्ज विकायची गरज काय, आर्यन खानच्या युक्तीवादातील 10 मुद्दे