मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मुंबईत अनेक ठिकाणी धाडी (Enforcement Directorate searches) टाकल्या. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचे घर आणि संबंधित मालमत्तांच्या व्यवहारांशी निगडित मनी लॉन्ड्रिंग (Money laundering) प्रकरणांच्या चौकशीचा भाग म्हणून ही छापेमारी सुरु असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडीच्या कारवाईवर शिवसेना आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं होतं. केंद्रीय तपास यंत्रणांनीही ही प्रेस कॉन्फरन्स ऐकावी, असं आवाहन राऊतांनी केलं होतं. या पार्श्वभूमीवर या छाप्यांना विशेष महत्त्व आहे. मुंबईतील सुमारे दहा ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलमां अंतर्गत ही कारवाई केली जात आहे.
ईडीने अंडरवर्ल्ड डाऊन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचे घर आणि इतर मालमत्तांवर छापे टाकले आहेत. एका राजकीय नेत्याशी संबंधित ठिकाणांवरही ही धाड सुरु असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नुकत्याच दाखल केलेल्या एफआयआर आणि गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ईडीची कारवाई सुरु असल्याचंही सांगितलं जात आहे.
जी काही दादागिरी चालली आहे त्याला आम्ही उत्तर देऊ. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेना, ठाकरे परिवारावर जो काही आरोपांचा चिखल उडवला जातोय त्याला आम्ही उत्तर देऊ. हा जेलमध्ये जाईल तो जेलमध्ये जाईल. देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत असेल असं काही सांगितलं जात आहे. पण आता देशमुख कोठडीबाहेर असतील आणि भाजपचे साडेतीन लोकं अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील. आय रिपीट, भाजपचे साडेतीन लोकं लवकरच तुरुंगात असतील, असं संजय राऊत सोमवारी पत्रकार परिषद घेऊन म्हणाले.
महाराष्ट्रातही सरकार आहे. हे लक्षात घ्या. ते शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. सरकार हे सरकार असतं. त्यामुळे ज्यांना आत टाकायचे आहे, त्याचा बंदोबस्त सुरू आहे. हमाम में सब नंगे होते है. एक मर्यादा असते राजकारणात. तुम्ही ती ओलांडली आहे. सर्वांना माहीत आहे मी काय बोलतोय आणि कुणाबद्दल बोलत आहे. माझ्या बोलण्यामुळे त्यांची झोप उडाली आहे. आम्हाला धमक्या देऊ नका. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. मी तर नाहीच नाही. एजन्सी आणि सरकारला जे उखडायचे ते उखडा, असा इशाराच त्यांनी दिला.
संबंधित बातम्या:
भाजपचे साडेतीन लोक तुरुंगात जातील, आय रिपीट, जे उखडायचे ते उखडा; संजय राऊतांचा मोठा दावा