वसई : वसईतील नामवंत डॉक्टरच्या घरी दरोडा टाकून नेपाळला फरार होणाऱ्या नेपाळी वॉचमन गॅंगला 48 तासात अटक करण्यात वसई पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील तिघा जणांचा कारने अडीचशे किलोमीटर अंतरापर्यंत फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन पकडण्यात आले, मात्र त्यांचा आणखी एक साथीदार फरार झाला आहे. त्यांच्याकडून 13 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. नेपाळला पळून जाणाऱ्या गॅंगला गुजरातच्या गोध्रा येथून तात्काळ सतर्कता दाखवून पकडल्याने ही कामगिरी करणाऱ्या पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सुरेंद्र आमरीत बोगाटी, झपातसोप शरपजित सोपं, शेहरहाद्दूर फुलबहाद्दूर शाही असे अटक करण्यात आलेल्या नेपाळी गॅंगच्या आरोपींची नावं आहेत. तर यांचा एक साथीदार फरार झाला आहे. हे सर्वच जण नेपाळ देशातील राहणारे आहेत. अटक आरोपी मधील सुरेंद्र बोगाटी हा वसई पश्चिम बाभोळा परिसरातील एका नामवंत डॉक्टरच्या घरी मागच्या एक वर्षापासून सुरक्षारक्षकाचे काम करत होता.
नेमकं काय घडलं?
डॉक्टर कुटुंबीय 28 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथे खाजगी कार्यक्रमासाठी गेले असता 30 नोव्हेंबरच्या मध्यरात्री संधी साधून त्याने त्याच्या इतर साथीदारांना बोलावून, बंगल्याचे दार तोडून, घरातील सोने, चांदी, मौल्यवान वस्तूंसह रोख रक्कम असा 15 लाख 20 हजारांचा मुद्देमाल चोरला आणि ते फरार झाले होते. याबाबत वसई पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. घरातील सीसीटीव्ही, मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही तपासून, त्यातील वर्णनाच्या व्यक्तीचा शोध घेतला असता, सुरक्षारक्षक यात सामील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.
घटनास्थळावर मिळालेले पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे वसई पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र 6 पथकं निर्माण केली होती. ज्या सुरक्षारक्षकांचा यात समावेश होता, त्या सुरक्षारक्षकांच्या पहिल्या नावा शिवाय दुसरी काहीच माहिती डॉक्टर कुटुंबीयांकडे नव्हती. पोलिसांनी वसई, नवी मुंबई, गुजरात, सुरत, या परिसरात राहणाऱ्या नेपाळी व्यक्तींची माहिती काढली.
250 किलोमीटर कारने पाठलाग
सुरत येथील एका व्यक्तीची त्यांना माहिती मिळाली असता पोलीस पथकाने सुरत येथील नेपाळी व्यक्तीला ताब्यात घेऊन विचारपूस केली. तेव्हा तिघे जण गुजरातमधील सुरत येथून नेपाळला एका बसने गेले असल्याची माहिती मिळाली, तात्काळ वसई गुन्हे प्रकटीकरण पथकाने बस आगारातील त्या बसचा शोध घेऊन, चालकाच्या मोबाईल नंबरवर फोन लावून त्याच्याशी संपर्क साधला आणि त्या बसमध्ये आरोपी असल्याची खात्री करून घेतली. जवळपास 250 किलोमीटर एका कारने पाठलाग करून, गुजरातमधील गोध्रा परिसरात जाऊन तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याजवळ 13 लाख 93 हजारांचा मुद्देमालही पोलिसांना मिळाला आहे.
संबंधित बातम्या :
CCTV | कॉलेजबाहेर विद्यार्थ्यावर सपासप वार, नाशकातील हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद
दुसऱ्या लग्नाला विरोध करणाऱ्या आजीची मुंबईत हत्या, सात वर्षांनी नातू तिसऱ्या बायकोसोबत सापडला
पत्नीच्या हत्या प्रकरणातून जिने जामिनावर सोडवलं, त्याच बहिणीचा भांडणानंतर खून