डोंबिवली : गावच्या 20 गुंठे जमिनीसाठी दगडाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी मृताच्या चुलत भावाला अटक केली आहे. पुराण महतो यांच्या हत्येप्रकरणी आरोपी चुलत भाऊ कालुकुमार महतो याला झारखंड येथून बेड्या ठोकण्यात आल्या.
विशेष म्हणजे आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना गावकऱ्यांनी तीव्र विरोध करून दगडफेक केली, मात्र त्यांच्या विरोधाला न जुमानता मोठ्या साहसाने पोलीस कालुकुमारला ताब्यात घेत डोंबिवलीला घेऊन आले. मात्र त्याचा साथीदार आणि भाऊ लालूकुमार हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण?
मूळ झारखंड इथे राहणारे पुरण महतो हे हातमजुरीचे काम करण्यासाठी डोंबिवलीतील गोळवली गावात राहत होते. तर त्यांच्या शेजारी त्यांचे चुलत भाऊ म्हणजेच आरोपी कालूकुमार आणि लालूकुमार हे दोघेही राहत होते. पुरण आणि कालूकुमार यांच्यात झारखंड येथील गावच्या एक बिघा म्हणजे 20 गुंठे जमिनीवरुन वाद सुरु होता. त्यावरुन चुलत भावाचा काटा काढून हा वाद कायमचा संपवण्याचा डाव कालूकुमार आणि लालूकुमार यांनी आखला.
नेमकं काय घडलं?
4 नोव्हेंबर रोजी या दोघांनी पुरणला जेवण करण्यासाठी घरी बोलवले. दोघांनी पुरणला दारू पाजली. त्यानंतर त्याच्याशी भांडण करून त्याच्या डोक्यात दगड घातला आणि तिथून पळून गेले. यावेळी, जखमी अवस्थेत एक तरूण पडला असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी पुरणला रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पुरणचा 8 नोव्हेंबर रोजी मुंबईतील सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी जे डी मोरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला .
ही हत्या मालमत्तेच्या वादातून झाली असून चुलत भाऊ कालू कुमार आणि लालू कुमार यांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला. या दोघांच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे आणि तांत्रिकदृष्ट्या तपास करत कल्याण नजीक असलेल्या म्हारलपासून ते सुरत, भुसावळ या ठिकाणी या दोघांचा शोध घेण्यात आला.
गावी पोलीस पथकावर दगडफेक
याच दरम्यान हे दोन्ही आरोपी मूळ गावी पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अविनाश वनवे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे एक पथक झारखंड येथील त्यांच्या मूळ गावी दाखल झाले. कालू कुमारला ताब्यात घेतले असता गावातील स्थानिकाकडून पोलिसांच्या पथकाला प्रचंड विरोध झाला. यावेळी ग्रामस्थांकडून पोलिसांच्या पथकावर दगडफेकही करण्यात आली. मात्र मानपाडा पोलिसांच्या पथकाने मोठ्या साहसाने कालूकुमारला तेथून ताब्यात घेऊन अटक केली.
दुसरा आरोपी फरार
या गुन्ह्यातील दुसरा आरोपी लालकुमार हा अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक कालूकुमार याला कल्याण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 22 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
संबंधित बातम्या :
पोलीस असल्याचं सांगून प्रेमी युगुलाचे फोटो काढले, नंतर प्रियकरासमोरच प्रेयसीवर बलात्कार