ठाणे : सेप्टिक टँक (Septic Tank) साफ करण्यासाठी गेलेल्या दोघा जणांचा मृत्यू झाल्याची आणखी एक घटना ठाण्यात (Thane) समोर आली आहे. मुंब्रा येथील ग्रेस स्वेअर सोसायटीमध्ये सेप्टिक टँक साफ करण्यासाठी दोघं जण उतरले होते. मात्र टाकीतील विषारी वायूमुळे गुदमरून त्यांना प्राण गमवावे लागले. सुरज मढवी (वय 22 वर्ष) आणि हनुमंत गडवा (वय 26 वर्ष) असं मृत्यू झालेल्या दोघा जणांची नावं आहेत. हे दोघेही ठाणे महानगर पालिकेतील ठेकेदाराकडे कंत्राटी कामगार आहेत.
सेप्टिक टँक साफ करण्यासाठी गेलेल्या कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना ठाण्यात ताजी असतानाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. मुंब्रा येथील ग्रेस स्वेअर सोसायटीमध्ये सेप्टिक टँक साफ करण्यासाठी उतरलेल्या दोघांचा टाकीतील विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला.
सुरज मढवी आणि हनुमंत गडवा हे दोघेही ठाणे महापालिकेतील ठेकेदाराकडे कंत्राटी कामगार आहेत. काम संपवून दुपारी तीन वाजता सुट्टी झाल्यानंतर चार पैसे जास्त कमावण्यासाठी ते खाजगी काम करत होते.
काल (मंगळवारी) हे दोघेही ग्रेस स्वेअर सोसायटीच्या सेप्टिक टँकची साफसफाई करण्यासाठी गेले असता सेप्टिक टँकमधील विषारी वायुमुळे गुदमरून ते दोघेही बेशुद्ध पडले. मुंब्रा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले.
त्या दोघांना मुंब्रा येथील प्राईम हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी या दोघांना मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करत दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरु आहे.
संबंधित बातम्या :
गोवंडीत सेफ्टीक टँकमध्ये गुदमरुन 3 सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू
सेप्टीक टँकमध्ये तिघांचा, तर नाल्यात 2 जणांचा मृत्यू
बीडमध्ये सेप्टिक टाकीत गुदमरुन दोघांचा मृत्यू, 3 कामगार अत्यवस्थ