उल्हासनगर : गाडीला धडक दिल्याच्या कारणावरुन तरुणाची हत्या (Youth Murder) करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात (Ulhasnagar Thane Crime News) हा धक्कादायक प्रकार घडला. तीन चाकी टेम्पोला धडक दिल्याचा दावा करत बाईकस्वाराने एका तरुणाला मारहाण करत त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागातून सोमवारी रात्री आकाश संचेरिया हा भाजी विक्रेता तरुण त्याचा मित्र भरत उर्फ सोनू पाटडीया याच्यासोबत तीन चाकी टेम्पोने जात होता. यावेळी त्यांच्या मागून करण जसुजा हा तरुण दुचाकीवरून आला आणि त्याने या टेम्पोसमोर दुचाकी आडवी लावली.
तुम्ही माझ्या दुचाकीला धडक दिली, असा आरोप करणने केला. तसंच टेम्पो चालवत असलेल्या आकाश संचेरिया याला त्याने मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे भरत उर्फ सोनू पाटडीया हा मध्ये पडला. तेव्हा करण जसुजा याने त्यालाही खाली पाडून मारहाण केली.
या मारहाणीत जागीच बेशुद्ध पडलेल्या भरत उर्फ सोनू पाटडीया याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.
दुचाकी चालक हा अनोळखी असल्याने त्याचा माग काढता येत नव्हता. मात्र उल्हासनगर पोलिसांनी आपलं नेटवर्क वापरून अवघ्या पाच तासात दुचाकीचालक करण जसुजा याला बेड्या ठोकल्याची माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.
दुचाकीचालक करण जसुजा याच्यावर यापूर्वी कोणते गुन्हे दाखल आहेत का? याचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू केला आहे. कोणताही धागा दोरा नसताना अवघ्या काही तासात उल्हासनगर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्याने पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे