उल्हासनगर : इमारतीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या नेपाळी वॉचमननेच एक घर लुटून पोबारा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरात शहरात हा प्रकार घडला आहे. मुलगा, सून आणि नातू घराबाहेर गेल्याची संधी साधत वॉचमन घरात शिरला आणि वृद्ध महिला एकटी असल्याचं पाहून तिला बांधून साडेसात लाख रुपयांचा ऐवज घेऊन पळाला. या घटनेनं उल्हासनगर शहरात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील सेक्शन 20 मध्ये ऐन पाडव्याच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ही घटना घडली. या भागात असलेल्या लिला व्हिला इमारतीत व्यावसायिक मनोजकुमार बजाज हे त्यांच्या आई, पत्नी आणि मुलासह वास्तव्याला आहेत. शुक्रवारी मनोज हे नेहमीप्रमाणे त्यांच्या व्यवसायासाठी निघून गेले, तर मनोज यांची पत्नी आणि मुलगा दुपारी एका नातेवाईकाकडे गेले होते.
नेमकं काय घडलं?
यावेळी मनोज यांची 76 वर्षीय आई लाजवंती बजाज या घरात एकट्याच होत्या. हीच संधी साधत त्यांच्या इमारतीचा नेपाळी वॉचमन दीपक हा पार्सल देण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरात आला. यानंतर त्याने लाजवंती यांच्याकडे पाणी मागितलं. पाणी देण्यासाठी लाजवंती मागे वळताच त्याचे आणखी दोन साथीदार हे कटावणी, मोठे स्क्रू ड्रायव्हर घेऊन घरात घुसले.
त्यांनी आधी लाजवंती यांचे हातपाय सेलो टेपने बांधून ठेवले. मात्र त्यांनी प्रतिकार केल्यानं या तिघांनी त्यांच्या तोंडात बोळा कोंबत त्यांचा आवाज दाबला. त्यानंतर घरातली दोन कपाटं फोडून त्यातून 4 लाख 70 हजार रुपयांची रोख रक्कम, दागिने असा सरकारी मूल्यानुसार सुमारे साडेसात लाख रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला.
चार जण सीसीटीव्हीत कैद
ही जबरी चोरी करून इमारतीतून पळून जाताना चार जण सीसीटीव्हीत कैद झाले. त्यामुळे एक जण खाली रखवालीसाठी उभा केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेनंतर काही वेळाने लाजवंती यांची सून आणि नातू हे घरी आले असता त्यांना लाजवंती या सेलोटेपने गुंडाळलेल्या अवस्थेत दिसल्या. त्यामुळे त्यांनी आजींची सुटका केली. तेव्हा इमारतीचा वॉचमन दीपक यानेच त्याच्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची धक्कादायक बाब समोर आली.
या प्रकरणी मनोज बजाज यांच्या तक्रारीनुसार मध्यवर्ती पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून दीपकच्या शोधासाठी आठ टीम रवाना करण्यात आल्या आहेत. तर क्राईम ब्रँचकडूनही या प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरू करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
सचिन वाझे आणि परमबीर सिंह क्रिकेट बुकींकडून खंडणी उकळायचे, मुंबई पोलिसांचा दावा
वसईत अंधश्रद्धेतून भोंदूबाबाकडून महिलेची लाखो रुपयांची फसवणूक, आरोपी अटकेत