उल्हासनगर : व्यापारी आणि त्याच्या कर्मचाऱ्याला काही गुंडांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये उघडकीस आली आहे. पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून ही मारहाण केल्याचा आरोप आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर दोन भागातील एका दुकानात तीन दिवसांपूर्वी काही गुंडांची व्यापाऱ्यासोबत हाणामारी झाली होती. हा वाद मिटवण्यासाठी दुकानाचा कर्मचारी दीपक छाब्रिया गेला होता. तसेच या गुंडांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्यासोबत तो होता. याचाच राग गुंडांच्या मनात होता.
नेमकं काय घडलं?
शनिवारी रात्री साडेनऊ वाजता दीपक छाब्रिया राहुल शूज दुकानाबाहेर उभा असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्याला लोखंडी रॉड आणि लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. तसेच हे भांडण सोडवण्यासाठी गेलेले राहुल शूज दुकानाचे मालक दीपक गोकलानी यांनाही गुंडांनी मारहाण करत दुकानाबाहेर तोडफोड केली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरा चित्रित झाली आहे.
चारही हल्लेखोर पसार
या हाणामारीत जखमी झालेल्या दीपक गोपलानी आणि दुकानाचा कर्मचारी दीपक छाब्रिया यांना उल्हासनगरमधील ममता नर्सिंग होम या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात दीपक छाब्रिया हे गंभीर जखमी झाले आहेत. हल्ला करुन चारही हल्लेखोर पळून गेले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर उल्हासनगरमधील व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. व्यापारी संघटना सतत गुंडांकडून व्यापाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीचा संताप व्यक्त करत आहेत.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन राडा, कवठे महंकाळमध्ये 2 गट भिडले, लोखंडी रॉड- दंडुक्याने मारहाण