मुंबई : मुंबईच्या मालाडमध्ये (Malad Suicide) धक्कादायक घटना घडली. एका 38 वर्षांच्या तरुणानं आत्महत्या केली आहे. या तरुणाचं नाव संदीप कोरेगावकर आहे. संदीप यांचे फोटो एका लोन एजंटनं व्हॉट्सअपवरुन व्हायरल (WhatsApp viral) केले. धक्कादायक बाब म्हणजे हे हे फोटो मॉर्फ केलेल असून ते न्यूड फोटो होते. या फोटोंना संदीप यांच्या मित्रांना, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या ऑफिसमधील लोकांना आणि नातेवाईकांना पाठवण्यात आले. ही बाब लक्षात आल्यानंतर निराश झालेल्या संदीप यांनी जीव दिलाय. या घटनेनं मालाडमध्ये खळबळ उडाली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलंय. याप्रकरणी पोलिसांनी (Kurar Police, Mumbai) गुन्हा देखील नोंदवला असून एकूण 5 जणांना याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. कर्जाची माहिती देताना त्यांचे फोटो आणि इतर डाटा लोन ऍप एजंटनं मिळवली होती. या माहितीचा गैरफायदा उचलण्यात आल्याचा आरोप संदीप यांच्या कुटुंबीयांनी केलाय. लोन रिकव्हरी एजंटकडून करण्यात आलेल्या या कृत्यामुळे एकच संताप व्यक्त केला जातोय.
संदीप हा एका लिफ्ट कंपनीत कामाला होता. त्यानं लोनचे ईएमआय वेळेत भरले होते. कोणाचेही पैसे त्याने बुडवले नव्हते. तरिही असं गैरकृत्य त्याच्यासोबत का केलं गेलं, असा आरोप संदीपच्या भावानं केलाय. संदीपचे भाऊ दत्तगुरु यांनी संदीपचा या फोटोंद्वारे छळ केला जात होता. आपल्याबाबतचा अश्लिल फोटो आणि मजकूर शेअर केल्यामुळे संदीपनं टोकाचं पाऊल उचललंय. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचंही पोलिसांनी म्हटलंय.
डीसीपी सोमनाथ घागरे यांनी या आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. आत्महत्येला प्रवृत्त करणं, फसवणूक करणं, बदनामी करणं तसंच माहिती चोरणं, अशा प्रकारचे गुन्हे पाचही जणांविरोधात दाखल केले गेलेत. कुरार पोलीस याप्रकरणी आता अधिक तपास करत आहेत.
एका लोन ऍप एजंटनं संदीपकडे पैशांसाठी तगादा लावला होता, अशा संशय व्यक्त केला जातोय. संदीपनं आपल्या भावाला फोन करुन याबाबत माहिती दिली होती. मी कोणत्याही ऍपवरुन कर्ज घेतलेलं नाही, असं सांगितलं होतं. कुरार पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. मात्र तरिही संदीप यांना फोन करुन एजंट शिवीगाळ करत होते आणि कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी धमकावत होते, असं पोलिसांनी म्हटलंय. घरात कुणीही नसताना संदीपनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. संदीपची पत्नी, त्याचा भाऊ, भावाचा मुलगा आणि त्यांचे आईवडील हे गावी गेले होते. घरात कुणी नाही हे पाहून संदीप यांनी टोकाचं पाऊल उचललंय.