डोंबिवली (ठाणे) : माझ्या वहिनीकडे काम करु नकोस, अन्यथा तुला जीवे मारणार, अशी धमकी देणाऱ्या इसमाची तलवारीने हत्या करण्यात आल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. मुकूंद चौधरी असं मृतक व्यक्तीचं नाव आहे. तर हितेश उर्फ काल्या नकवाल असं आरोपीचं नाव आहे. मुकूंदच्या वहिनी डोंबिवलीत मासेविक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्याजवळ आरोपी हितेश हा काम करायचा. पण हितेशने तिथे काम करु नये, असं मृतकाची इच्छा होती. त्यातून त्याने आरोपीला दमदाटी दिली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यातून आरोपीने मुकूंदची हत्या केली. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
डोंबिवली पूर्व भागातील खंबालपाडा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. खंबालपाडा परिसरात भानूदास उर्फ मुकुंद दत्तू चौधरी हे राहत होते. मुकुंद यांच्या वहिनीचा मासेविक्रीचा व्यवयास आहे. वहिनीकडे हितेश उर्फ काल्या नकवाल हा तरुण काम करतो. मुकुंद याने अनेकवेळा हितेश याला धमकाविले होते की, वहिनीकडे काम करु नको. पण हितेश त्याचं काहीएक ऐकत नव्हता.
या दरम्यान शनिवारी (23 ऑक्टोबर) संध्याकाळी मुकुंद याने पुन्हा हितेश याला आपल्या शेताकडे येण्यास सांगितले. हितेश त्याठिकाणी पोहोचला. मुकुंदने त्याच्या जवळील तलवार बाहेर काढली. हितेशला तलवार दाखवित पुन्हा धमकाविले की, आता तू काम सोडले नाही तर याच तलवारीने तुझा खात्मा करेन. या दरम्यान हितेन आणि मुकुंद यांच्यात वाद झाला. या वादात हितेशने मुकुंदच्या हातातील तलवार हिसकावून मुकुंदवर वार केले. या हल्ल्यात मुकुंद जागीच ठार झाला.
या प्रकरणी टिळकनगरच्या पोलिसांनी हितेश नकवाल याला अटक केली आहे. यात जमीनीच्या वादातून ही हत्या झाल्याची चर्चा असल्याने पोलीस सर्व अंगांनी या प्रकरणाचा तपास करीत आहेत. मात्र काम सोडण्यावरुन झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अजय आफळे यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
साडीने गळा आवळून वडिलांची हत्या, आत्महत्येचा बनाव, हिंगोलीतील तरुणाचं बिंग आठ महिन्यांनी फुटलं
दहा दिवस पोलिसांना गुंगारा, पोटच्या पोरीला टाकीत बुडवून मारणारी आई Google मुळे कशी सापडली?
आई-वडिलांच्या भांडणात मध्यस्थी, बापाकडून मानेवर कोयत्याने वार, बारामतीत तरुणाचा मृत्यू